esakal | पंढरपूर येथे केवळ 38 तासांत उभारले कोव्हिड हॉस्पिटल !
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Center

पंढरपूर येथे केवळ 38 तासांत उभारले कोव्हिड हॉस्पिटल !

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्राधान्याने पोलिस कर्मचाऱ्यांसाठी येथील पोलिस संकुलात अवघ्या 38 तासांत

कोव्हिड ऑक्‍सिजन हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस वेल्फेअर फंड आणि देणगीदारांच्या माध्यमातून आवश्‍यक निधी जमा करून हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रथमच अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील सर्व कोव्हिड डेडिकेटेड हॉस्पिटल्स रुग्णांनी भरून गेली आहेत. त्यातच या हॉस्पिटलना आवश्‍यक असलेला ऑक्‍सिजन पुरवठा कमी झाला असून, रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन मिळत नसल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्तासाठी आले आहेत. हे लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे पोलिस संकुलात कोव्हिड ऑक्‍सिजन हॉस्पिटल उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

श्री. कदम म्हणाले, या हॉस्पिटलमध्ये 48 ऑक्‍सिजन बेड तसेच त्याशिवाय 20 आब्झर्वेशन बेड आहेत. सातारा येथील डब्ल्यू. आर. ग्रुप ऑफ बिझनेसचे रोहन वाघमारे, त्यांचे अभियंते आणि कर्मचारी यांनी अवघ्या 38 तासांमध्ये या हॉस्पिटलमध्ये आवश्‍यक असलेल्या सुविधा तयार करून दिल्या आहेत.

परिस्थिती लक्षात घेऊन आवश्‍यकतेनुसार पोलिसांशिवाय सामान्य लोकांवर देखील तिथे सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते ऑनलाइन या हॉस्पिलचे उद्‌घाटन करण्यात आले. या ठिकाणी पोलिसांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

येथील लाईफलाइन हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. मंजूषा देशमुख, डॉ. संजय देशमुख म्हणाले, लाईफलाइन हॉस्पिटलमधील कन्सल्टंट डॉ. नीरज दोडके, डॉ. सचिन बेलदार तसेच वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ उपचारासाठी कार्यरत असणार आहे. तिथे अविरत ऑक्‍सिजन उपलब्ध राहील, अशी व्यवस्था केली जाणार असून व्हेंटिलेटरची गरज भासल्यास ती व्यवस्था देखील केली जाणार आहे.