भीतीतून दिलासाकडे वाटचाल ! अक्कलकोट येथे कोविशिल्ड लसीकरणाला प्रारंभ 

Akt Covishield
Akt Covishield

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचा परिसर... शनिवारी सकाळी एकदम प्रसन्न वातावरणात काढलेली सुंदर रांगोळी, सर्वत्र कमालीची स्वछता व उत्साहवर्धक वातावरणात कोविशिल्ड लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. लसीकरण मोहिमेसाठी एकूण 1158 डॉक्‍टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी ग्रामीण रुग्णालयात एकूण 640 लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील आज पहिल्या दिवशी एकूण 100 जणांना लस देण्यात येणार आहे. पहिली लस इसमोद्दिन काझी यांना देण्यात येऊन मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. 

या वेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, गटविकास अधिकारी महादेव कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेड, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक राठोड, डॉ. वीरभद्र मेंथे, महेश भोरे, बालाजी अल्लडवाड, डॉ. सतीश बिराजदार, डॉ. गजानन मारकड, डॉ. नीरज जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी लसीकरण प्रतीक्षा कक्ष, तपासणी, लस देणे, ऑनलाइन नोंदणी करणे तसेच लस देऊन त्यांना दिलेल्या क्रमांकावर अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवून कोणता त्रास नाही झाला तर घरी जाऊ देण्यात आले. अचानक कोणता त्रास होत असेल तर वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात येऊन त्यासाठी ऍम्ब्युलन्स सेवा तयार ठेवण्यात आली होती. आजची पहिली लस इसमोद्दिन काझी तर दुसरी ओम स्वामी यांना देण्यात आली. पहिली लस रेश्‍मा शेख, वैभव हिप्परगी यांच्या नियंत्रणाखाली देण्यात आले. या वेळी लस घेतलेल्या अनेक जणांना कोणताही त्रास जाणवल्याचे दिसले नाही. 

या लसीकरण मोहिमेने सर्वसामान्य नागरिकांचा तणाव मात्र थोडासा निवळण्यास मदत होणार आहे, हे निश्‍चित आहे. या मोहिमेचे संयोजन महिबूब निटोरे, श्रीकांत हसरमनी, सिद्रामप्पा लोकापुरे, नजीर दलाल, शिवाजी चंदनशिवे, सुरेश भास्कर, मारुती मेणसे, अनिल शिंदे, ग्रेस काकडे, अंजली खरात, शिवानंद चितली, हुसेनबाशा मुजावर व सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. 

लसीकरणाचा प्रारंभ करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांचे धैर्याचे कौतुक करावे तेवढे कमीच असून, त्यांनी कोरोना काळात आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत, दिवसरात्र काम करून कोरोनाला थोपविण्याचे काम केले असल्याने, आजचे सुवर्णक्षण अनुभवता आले. कोरोना काळात अनेक वाईट अनुभव लोकांना आले. नागरिक मोठ्या दहशतीत वावरले. अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तीला गमवावे लागले तरी आलेल्या संकटाला मोठ्या धैर्याने तोंड देत शासनाच्या सर्व विभागांनी दिवसरात्र मेहनत करून कोरोनाच सामना केला. आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम तर वाखाणण्याजोगे होते. त्यांनी तेव्हाच भीती दूर करून राष्ट्रीय कर्तव्यास सामाजिक जबाबदारीची जोड देऊन निरंतर कष्ट घेतले. आजची आलेली लस ही मोठी दिलासादायक बाब असून, तणाव कमी करणारी आहे. नुसती ही लस घेतल्याने भागणार नाही तर आणखी एक लस 28 दिवसांनी घ्यावी लागेल आणि मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवणे ही पथ्ये पाळावीच लागतील. याशिवाय पूर्ण सुरक्षितता मिळणार नाही. 

ठळक... 

  • सकाळी साडेनऊपासून मुख्य कार्यकारी अधिकारी लसीकरण ठिकाणी उपस्थित 
  • लस घेण्यास आरोग्य कर्मचारी स्वयंस्फूर्तीने तयार 
  • आजच्या दिलसादायक वातावरणाने कोरोनाची भीती कमी होण्यास होणार मदत 
  • स्वामी यांनी थोपटली कोरोना योद्‌ध्यांची पाठ 
  • आरोग्य विभागाने केले उत्कृष्ट नियोजन 

कोरोनाच्या महामारीने त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी खूप मेहनतीने शास्त्रज्ञांनी ही लस आणली आहे. त्याला प्रतिबंध होतोय, पण मनात कोणतीही भीती न बाळगता मी स्वतःहून ही लस प्रथम घेत आहे. याचा मला खूप अभिमान आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, त्यामुळे कुणीही याचा अपप्रचार न करता ही लस घेऊन सुरक्षित राहावे. 
- इसमोद्दिन काझी,
प्रथम लाभार्थी, अक्कलकोट 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com