
‘कोविशिल्ड’ लस संपली! सोलापूर शहरात लसीकरण बंदचे फलक
सोलापूर : शहरातील १२ वर्षांवरील आठ लाख १४ हजार ५६५ जणांपैकी एक लाख २८ हजार व्यक्तींनी अद्याप कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा एकही डोस घेतलेला नाही. आता कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने लस टोचण्यासाठी गर्दी वाढत आहेत. अशातच शहरातील कोविशिल्ड लसीचा साठा संपल्याने दुसरा डोस व बुस्टर (संरक्षित) डोस घेणाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी आणखी कोविशिल्ड लसीचे १४ लाख डोस लागणार आहेत. शहरातील लस पूर्णत: संपली असून मागच्या आठवड्यात थोडे डोस राज्याकडून मिळाले होते. सध्या १८ ते २० हजार डोस शिल्लक असून तेही ग्रामीण भागात वितरीत केले आहेत. १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोर्बोवॅक्स तर १५ ते १७ वयोगटाला कोवॅक्सिन लस दिली जात आहे. त्यापुढील वयोगटातील लोक कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड लस घेऊ शकतात. परंतु, आता कोविशिल्ड लस संपल्याने पहिला डोस घेतलेल्यांनाही दुसरा डोस घेता येत नाही आणि दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या व्यक्तींना संरक्षित (बुस्टर) डोस मिळत नसल्याची स्थिती शहरात आहे. त्यामुळे शहरातील १५ नागरी आरोग्य केंद्रांबाहेर लसीकरण बंद असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.
शहरातील लसीकरणाची स्थिती
लसीकरणाचे एकूण टार्गेट
८,१४,५६५
पहिला डोस घेतलेले
६,८६४३९
दोन्ही डोस घेतलेले
५,२०,०३१
संरक्षित डोस घेतलेले
३६,०२२
१८ ते ४४ वयोगटाला नाही गांभीर्य
कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण सुरु होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला. तरीदेखील सोलापुरातील सव्वालाख व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. शहरातील १८ ते ४४ वयोगटातील तब्बल ६२ हजार तरुण अजूनही लसीकरणापासून दूरच आहेत. तसेच १५ ते १७ वयोगटातील जवळपास २१ हजार, ४५ ते ५९ वयोगटातील ३७ हजार आणि १२ ते १४ वयोगटातील १२ हजार जणांनी अजूनपर्यंत लस घेतलेलीच नाही. शासनाकडून मोफत लसीकरण सुरु असतानाही त्यांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याची स्थिती आहे. आता कोरोनाची तिव्रता कमी झाल्याने अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे १८७ रुग्ण
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पण, प्रतिबंधित लसीकरणामुळे बहुतेक रुग्णांमध्ये कोरोनाची काहीही लक्षणे नाहीत. ते रुग्ण त्यांच्याच घरी उपचार घेतात. सध्या शहरात ४५ तर ग्रामीणमध्ये १४२ रुग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत दोन लाख २१ हजार २९९ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी चार हजार ७४१ जणांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील तब्बल दोन लाख १५ हजार ८७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बार्शी, माढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढ्यात सध्या अन्य तालुक्यांच्या तुलनेत अधिक रुग्ण आहेत.
Web Title: Covishield Vaccine Is Over Vaccination Stoped Board In Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..