
ब्रह्मपुरी (सोलापूर) : श्रावणात दरवर्षी गर्दी होणाऱ्या तालुक्यातील माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिर यंदा कोरोनामुळे ओस पडले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माचणूर येथील भीमा नदीच्या काठावर कडेकपारीत सुंदर असे निसर्गरम्य प्राचीन हेमाडपंती श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. मंदिराकडे डाव्या बाजूस भव्य असे मल्लिकार्जुन मंदिर व उजव्या बाजूस बाबा महाराज आर्विकार यांचा मठ आहे तसेच भीमा नदीच्या पात्रात सुंदर देखणे जटाशंकर मंदिर आहे. श्रावण मासानिमित्त या वर्षी कोरोनाच्या संकटात भाविकांची रेलचेल कमी असून, पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांना मंदिर परिसरातील प्रवेशद्वारातूनच दर्शन घेणे भाग पडले.
प्रत्येक वर्षी श्रावण मासानिमित्त मंदिर परिसर "हर हर महादेव'च्या जयघोषाने दुमदुमून जात होता. जगभरासह कोरोनाच्या संकटाने सोलापूर जिल्ह्यातही थैमान घातले असून, परिणामी तीर्थक्षेत्र असलेली मंदिरे कोरोनाच्या भीतीमुळे ओस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. मंदिर परिसरात दैनंदिन उपजीविका करणाऱ्या नारळ विक्रेता, फूल, मिठाई विक्रेता या व्यापाऱ्यांनाही फटका बसला असून, उदरनिर्वाह करणे मुश्किलीचे झाले आहे.
श्रावण महिन्याला सुरवात झाली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्या श्रावण सोमवारी माचणूर (ता. मंगळवेढा) येथील श्री सिद्धेश्वर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद होते. त्यामुळे प्रवेशद्वारावरूनच भाविकांना "श्रीं'चे दर्शन घेऊन समाधानी व्हावे लागले. भाविकांची रेलचेल नसल्यामुळे मंदिर परिसरात शांतता पसरली होती. प्रासादिक साहित्य व फूलहार विक्रेत्यांची दुकानांसमोरही गर्दी नसल्याने विक्रेत्यांना भाविकांचा प्रतिसाद मिळाला नाही.
याबाबत महिंद्र पुजारी म्हणाले, पारंपरिक पद्धतीने "श्रीं'ची पूजाअर्चा करीत असून, मंदिर बंद आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून प्रवेशद्वारातून भाविकांनी दर्शन घ्यावा. विनाकारण गर्दी करू नये.
माचणूरचे बाबू मुलाणी म्हणाले, यावर्षी कोरोनामुळे भाविकांची गर्दी कमी आहे. मंदिर परिसरात माझा नारळ विक्रीचा व्यवसाय असून, त्यावरच मी उपजीविका करीत आहे. पण कोरोनामुळे यंदा हा व्यवसाय करता येईना.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.