Cyber crime : मोह, अज्ञान अन्‌ घाईच संकटात नेई

मोठी वाढ; सुशिक्षित, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक
Cyber crime
Cyber crimeKALINGA

सोलापूर : कॉलेजमध्ये शिकत असलेली तरुणी घाईघाईत पोलिसांकडे आली... ती घाबरलेली होती... सतत चेहऱ्यावरील घाम पुसत होती... पोलिसांना म्हणाली, ‘माझा विवाह ठरलाय... माझा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची कोणीतरी धमकी दिलीय.’ सायबर पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन हकीकत विचारली. त्यावेळी व्हिडिओ गेम खेळताना कोणीतरी तिचा फोटो घेऊन त्याला वेगळे स्वरूप देऊन बदनामीची धमकी दिली आहे. काहीवेळा राजकीय लोक, सरकारी नोकरदार, सुशिक्षित तरुण सायबर गुन्हेगारांचे शिकार झाले आहेत. दरवर्षी राज्यभरातील ७० ते ९० हजार लोक सायबर गुन्हेगारांचे शिकार होतात आणि राज्यातील टॉप टेन शहर-जिल्ह्यांमध्ये सोलापूर देखील आहे. सायबर गुन्हेगारीचे जाळे जगभर विस्तारले असून, त्यासाठी लोकांचा मोह, घाई आणि अज्ञान या तीन गोष्टीच जबाबदार ठरल्या आहेत.

क्रिप्टो करन्सी : सोलाना, बिटकॉईन, इथरम अशा प्रकारच्या क्रिप्टो करन्सीतून गुंतवलेल्या रकमेवर २० टक्के जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांना पैसे गुंतवायला भाग पाडले जाते. क्रिप्टो करन्सीबद्दल काहीच माहिती नसतानाही लोक कोणाच्यातरी ऐकीव माहितीवर पैसे गुंतवतात आणि फसतात.

व्हिडिओ केवायसी : काही बॅंकांनी खातेदारांना घरबसल्या खाते उघडता यावे, यासाठी व्हिडिओ केवायसी करण्याची सुविधा दिली आहे. ही संधी साधून सायबर गुन्हेगार त्यांना हव्या असलेल्या बॅंकेतच तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून खाते उघडायला लावतात. स्वत:चा मोबाईल नंबर, ई-मेल देऊन त्या तरुणाचे खाते लोकांच्या फसवणुकीसाठी वापरतात.

बोगस साइटवरून फसवणूक : ओएलएक्स, ॲमेझॉन ही ॲप बोगस बनवून लोकांना स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखविले जाते. त्या वस्तू स्वस्तात मिळतात म्हणून काहीजण खरेदीसाठी तयारी दाखवतात. येताना पोलिसांनी गाडी पकडली म्हणून कागदपत्रे नसल्याने दंड भरायला पैसे पाठवा, असे सांगितले जाते. तसे खोटे सांगून हजारो रुपये काढतात.

सेलिब्रिटीचा वाढदिवस सांगून फसवणूक : सेलिब्रिटी, नेत्याचा वाढदिवस आहे, नवीन वर्ष आहे, सण-उत्सव असल्याचे सांगून एक-दोन ‘जीबी’चा मोबाईल डाटा मिळेल असे आमिष दाखविले जाते. त्यासाठी लिंक पाठवून बनावट ॲप डाउनलोड करायला सांगतात. त्यातून संबंधिताच्या खात्यातील पैसे काढले जातात.

फेक कस्टमर केअर : आपल्याकडील कस्टमर केअरचा कॉल लागत नाही, त्यावेळी लोक गूगलवरून कस्टमर केअरचा क्रमांक शोधतात. त्यावेळी काही नंबर बोगस असतात आणि सायबर गुन्हेगार संबंधिताचा मोबाईल नंबर मिळवतात. त्यातून आर्थिक फसवणूक करतात.

स्क्रीन शेअर : समोरील व्यक्तीला लिंक पाठवून ॲप डाउनलोड करायला सांगितले जाते. त्याखालील ‘आयडी’ विचारून घेतला जातो. त्यानंतर ओटीपी विचारून घेतात. त्यानंतर स्क्रीन शेअरचा ऑप्शन असतो. लोक घाईत त्या ठिकाणच्या ‘एस’ पर्यायावर क्लिक करतात. त्यावेळी समोरील व्यक्ती आपला मोबाईल ऑपरेट करतात आणि आपल्या खात्यातील पैसे काढून घेतात.

लोन ॲप : शून्य टक्के व्याजाने पाच हजाराचे कर्ज मिळेल म्हणून सायबर गुन्हेगार आधार, पॅनकार्ड क्रमांक घेतात. ॲप डाउनलोड करायला लावतात आणि त्या व्यक्तीच्या मोबाईलमधील संपर्क लिस्ट मिळवतात. लोन देतात आणि जादा पैशाची मागणी करतात. पैसे न दिल्यास बदनामीची धमकी देऊन आपल्या बदनामीचा मेसेज आपल्या मित्रांना पाठवतात.

सेक्स्टॉर्शन : व्हॉट्‌सअॅपवर व्हिडिओ कॉल करून नग्न व्हायला लावतात आणि समोरील व्यक्ती आपणही तसेच असल्याचे भासवते. त्यावेळी समोरील व्यक्तीच्या आमिषाला बळी पडून ती म्हणेल तसे वागतात. त्याचा व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. त्यातून पैसे उकळले जातात.

मुलांचे लैंगिक शोषण : व्हिडिओ गेम खेळताना मुलांना, तरुणांना अधूनमधून एक लिंक पाठवून त्या व्यक्तीला पहिल्यांदा फोटो मागतात. त्यानंतर लिंक पाठवून डान्स करायला लावतात. त्यावरून बनावट नग्न व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. त्यातून संबंधित मुला-मुलींच्या वडिलांकडून पैसे उकळले जातात.

वर्क फ्रॉम होम अन्‌ वर्क ऑर्डर : एक हजारांची वस्तू घ्या आणि २० टक्के जादा पैसे कमवा. घरबसल्या कमवा २०-३० हजार रुपये. व्हिडिओ कॉल करून मुलाखत घेतली जाते. लगेच वर्क ऑर्डर देतात आणि युनिफॉर्म, लॅपटॉप व शूज, टाय विकत घेण्यासाठी पैसे पाठवायला सांगितले जाते. पण, त्यातून मोठी फसवणूक करतात.

इतर : फेक फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्शुरन्स, पॉन्झि स्कीम, कौन बनेगा करोडपती, स्टॉक मार्केट,

आर्मी ऑफिसर आहोत, आम्हाला अडचण आहे, एमएसईबीचे लाईट बिल, ओपन प्लॉट स्वस्तात आणि आरोग्य अभियानातून मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या, अशा वेगवेगळ्या माध्यमांतून सायबर गुन्हेगार फसवणूक करतात.

नको नको मना गुंतु माया जाळी...

कोणीही मोहाच्या मायाजालात गुंतू नये, आमिषाला बळी पडू नये, असे सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘नको नको मना गुंतू माया जाळी । काळ आला जवळी ग्रासावया ।। काळाची उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ।।’

अशी घ्या काळजी

अनोळख्या क्रमांकावरून कॉल तथा मेसेज आल्यास त्याला वैयक्तिक स्वरूपाची कोणतीही माहिती अजिबात देऊ नका

मोबाईलमध्ये फ्री ॲप डाउनलोड करू नका; सायबर गुन्हेगार त्यातून घेतात आपल्या मोबाईलमधील डेटा

मोह टाळा, अज्ञान दूर करा आणि कोणीतरी पैसे गुंतवा, ज्यादा पैसे कमवा असे आमिष दाखवले तर अतिघाई करू नका

फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांत धाव घ्या, जेणेकरून गेलेले पैसे परत मिळू शकतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com