वा रे पठ्ठ्या, मुलगी १४ वर्षाची अन्‌ पती ३८ वर्षाचा! सोलापूर जिल्ह्यात रोखले दोन बालविवाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child marriage banned
वा रे पठ्ठ्या, मुलगी १४ वर्षाची अन्‌ पती ३८ वर्षाचा! सोलापूर जिल्ह्यात रोखले दोन बालविवाह

वा रे पठ्ठ्या, मुलगी १४ वर्षाची अन्‌ पती ३८ वर्षाचा! सोलापूर जिल्ह्यात रोखले दोन बालविवाह

सोलापूर : तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर होणारा बार्शी तालुक्यातील बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाने यश मिळाले आहे. १७ वर्षे आठ महिन्यांच्या मुलीचा तिच्या माता-पित्यांनी नात्यातील २५ वर्षीय तरूणाशी विवाह ठरवला होता. दुसरीकडे मोहोळ तालुक्यातील मुलीचा रविवारी (ता. ६) माढा तालुक्यातील मानेगावात करण्याचे निश्चित झाले होते. मुलीचे वय अवघे १४ वर्षे होते आणि मुलाचे वय तब्बल ३८ वर्षे होते. ते बालविवाह पोलिसांनी रोखले.

मुलगी बार्शी तालुक्यातील आणि मुलगा उस्मानाबाद जिल्ह्यातील होता. मुलीला अठरा वर्षे पूर्ण व्हायला चार महिने कमी असतानाही तिचा विवाह लावून दिला जात असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांना भ्रमणध्वनीद्वारे मिळाली. त्यानंतर श्री. वाघमारे यांनी जिल्हा स्तरावरून तत्काळ सूत्रे हलविली. तुळशी विवाहचा मुहूर्त साधून दोघांच्या नातेवाईकांनी दोघांचा बालविवाह ठरविला होता. विवाहाच्या दिवशीच बालविवाह रोखण्यासाठी पांगरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या नेतृत्वाखालील पथक विवाहस्थळी दाखल झाले. त्यावेळी घरासमोर लग्नमंडप घातलेला दिसून आला. नातेवाईकांनी सुरवातीला त्या मंडपात तुळशीचा विवाह लावला होता. त्यावेळी मंडपात पिवळी साडी घातलेली व हातावर मेहंदी काढून मुलीच्या हळदीचा विधी उरकण्याची लगबग पोलिसांना पहायला मिळाली. पोलिसांनी मुलीकडे विश्वासाने चौकशी केली. त्यावेळी मुलगी सज्ञान व्हायला चार महिने कमी असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन घेतले आणि पालकांचा जबाब नोंदवून बालकल्याण समितीसमोर हजर केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, परिविक्षा अधिकारी दीपक धायगुडे, नितीन इरकल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

मानेगावात (माढा) दुसरा बालविवाह रोखला

मोहोळ तालुक्यातील मुलीचा रविवारी (ता. ६) माढा तालुक्यातील मानेगावात करण्याचे निश्चित झाले होते. मुलीचे वय अवघे १४ वर्षे होते आणि मुलाचे वय तब्बल ३८ वर्षे होते. माढा पोलिसांना त्याची खबर लागली आणि पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शाम बुवा यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलीचे वय कमी असल्याने त्यांनी तिला बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले.