सोलापूर : भीमा चे दोन हजार सभासद रद्द

साखर संचालकांचा निर्णय; राजन पाटील गटाला मोठा धक्का
Decision Bhima members Two thousand canceled
Decision Bhima members Two thousand canceledsakal

मोहोळ: टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे दोन हजार १२८ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजकुमार दराडे यांनी दिला आहे. त्यामुळे भीमा कारखान्याच्या सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे. हा निर्णय कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील गटाला जोरदार धक्का असल्याचे मानले जात आहे.

कारखान्याचे सभासद तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण व माजी पंचायत समिती सदस्य अभिजित उर्फ नानासाहेब पवार (रा. अंकोली) यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी या कार्यालयाकडे सभासदत्व रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जात सदर सभासदांची कारखाना कार्यक्षेत्रात दहा गुंठेपेक्षा कमी जमीन असणे, भाग भांडवलाची रक्कम अपूर्ण असणे यासह अनेक प्रमुख मुद्यावर २ हजार ४५१ जणांचे सभासदत्व रद्द करावे, यासाठी हरकती दाखल केल्या होत्या. या प्रकरणाची सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे ९ सप्टेंबर २०२१ पासून किमान सहा वेळा सुनावणी घेण्यात आली. मात्र ज्यांच्याविषयी हरकत घेण्यात आली. त्यांनी कोणत्याही प्रकारचा समाधानकारक खुलासा केला नाही. तसेच वारंवार संधी देऊनही हरकतीच्या मुद्‌द्‌यांची पूर्तता करू शकले नाहीत. त्यामुळे सुनील चव्हाण व अभिजित पवार यांचे म्हणणे ग्राह्य धरून हा निकाल देण्यात आला.

दरम्यान, भीमा कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निकालाचा परिणाम म्हणून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेल्या माजी आमदार राजन पाटील यांच्या गटाला धक्का बसला आहे. दरम्यान, यातील पात्र असलेल्या ३२३ सभासदांपैकी ११० जणांची शेअर्सची रक्कम अपुरी आहे, यासह अन्य कारणामुळे त्यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे.

गेल्या दहा वर्षापासून मी कुठल्याही सभासदावर अन्याय होऊ दिला नाही आणि कारखान्याच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवले नाही. आगामी काळातही सभासदावर अन्याय केला जाणार नाही. ज्यांचे सभासदत्व रद्द झाले आहे, त्यांचाही ऊस कारखाना गाळपास नेणार आहे.

- धनंजय महाडिक, अध्यक्ष, भीमा साखर कारखाना, टाकळी सिकंदर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com