सोलापूर : मित्रांच्या सहवासामुळे स्पर्धा परीक्षेकडे आलेले बाळासाहेब चव्हाण आज महापालिका उपायुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Chavan

सोलापूर : मित्रांच्या सहवासामुळे स्पर्धा परीक्षेकडे आलेले बाळासाहेब चव्हाण आज महापालिका उपायुक्त

उपळाई बुद्रूक (सोलापूर) - आयुष्याच्या वाटेवर चालताना संगतीला खूप महत्त्व आहे. संगतच आयुष्याच्या रस्त्यावरून चालायला शिकवते. जर संगत चुकली तर आयुष्याचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय रहात नाही. परंतु चांगल्या माणसांच्या संगतीत राहिलो तरच नक्कीच प्रतिकूल परिस्थितीत देखील इच्छाशक्तीला खतपाणी मिळुन, आयुष्याला योग्य दिशा मिळते. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे पेनुर (ता. मोहोळ) येथील सुपुत्र तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब गजेंद्र चव्हाण होय. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

उपायुक्त चव्हाण त्यांच्या यशाबद्दल सांगतात की, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. काम करेल तेव्हाच घरी चुल पेटायची म्हटली तरी चालेल, आई-वडिल दोघेही पूर्णपणे निरक्षर. परंतु आपल्यावर जी वेळ आली आहे. ती मुलांवर येऊ नये यासाठी त्यांची नेहमी धडपड असायची. त्यामुळे माझ्यासह इतर तिनही भावंडांच्या शिक्षणासाठी त्यांचे नेहमी प्रोत्साहन असायचे. त्यासाठी ते दोघेही नालाबंडिंग रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरी करत शिक्षणासाठी पैसे उपलब्ध करून द्यायचे. त्यांचे कष्ट बघूनच मी शाळेच्या वेळापत्रकाशिवाय त्यांना मदत होईल म्हणुन गुरे, शेळ्या चारायला घेऊन जाणे हा नित्यक्रम असायचा. गावातीलच जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंतचे तर महात्मा गांधी विद्यालय येथे दहावीपर्यंतच शिक्षण पूर्ण केले. घरच्या परिस्थितीचे भान ठेवून शैक्षणिक गुणवत्तेत आलेख कसा वाढेल यासाठी प्रयत्नशील होतो. पुढे अकरावी व बारावीचे शिक्षण पंढरपूर येथील विवेकवर्धनी ज्युनिअर कॉलेजमध्ये तर पदवीचे शिक्षण बीए ला इंग्रजी विषय घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथून चांगल्या गुणांनी पूर्ण केले. आई-वडिलांना शिक्षणाचा आर्थिक भार जास्त पडु नये यासाठी 'कमवा व शिका' या योजनेतुन संपूर्ण शिक्षण पूर्ण पार पडले.

त्यानंतर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला. इंग्रजी व समाजशास्त्र या विषयातून 'पीजी' चे शिक्षण पूर्ण केले. पंढरपूरपासुन कोल्हापूर पर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च 'कमवा व शिका' या कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेतून झाला. पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत स्पर्धा परीक्षेबद्दल कसलेही ज्ञान नव्हते. परंतु याकाळात काही वरीष्ठ मित्रांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली. त्यात कृष्णा चवरे, दत्तात्रय गोरे यांच्याकडून मिळाली स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती मिळाली. हे सर्व वरिष्ठ मित्र स्पर्धा परीक्षेचा एकत्रित अभ्यास करत त्यात मी लहान असतानाही त्यांच्या संभाषण ते सहभागी करून घ्यायचे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेबद्दल चांगलेच आकर्षण निर्माण झाले. परंतु याकाळात एमपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक नियमित नसल्याने आर्थिक मानसिक व सामाजिक समस्यांना अनेक वेळा तोंड द्यावे लागले. त्यात खाजगी क्लासेस लावुन अभ्यास करणे शक्य नसल्याने, स्वंयअध्ययन करण्यावर भर दिला. परंतु वर्ष-वर्ष वेळ घालवून अभ्यास करणे शक्य नसल्याने, नोकरीच्या शोधात असतानाच एलआयसी विकास अधिकारी म्हणून नोकरी मिळाली.

अभ्यास करत जवळपास एक वर्षभर नोकरी केली. त्याचबरोबर जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू असल्याने, एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात राज्यात नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. त्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या प्रयत्नात मुख्याधिकारी पदी निवड झाली. त्यामुळे मुख्याधिकारी पदाची नोकरी स्वीकारली. सध्या पदोन्नतीने उपायुक्त म्हणून कार्यरत आहे.‌ 2000 ते 2008 वर्षांच्या कालावधीत राज्यसेवेच्या पाच वेळा मुख्य परीक्षा दिल्या तर तीन वेळा मुलाखती दिल्या. अर्थात यश मिळवणे अथवा न मिळवणे हे आपल्या इच्छाशक्तीवर आहे. यशासाठी स्वतःतली इच्छाशक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी संगत देखील महत्वाची आहे. मला वरिष्ठ चांगले मित्र लाभले, त्यात आईवडिलांचे कष्ट, कर्मवीर अण्णांच्या 'कमवा व शिका' योजनेची प्रेरणा त्यामुळेच या यशापर्यंत पोहचता आले.

Web Title: Deputy Commissioner Of Kalyan Dombivali Balasaheb Chavan Success Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top