esakal | धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, जनतेला फसवत सरकारने केला निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाउन !
sakal

बोलून बातमी शोधा

Dhairyashil_Mohite_Patil

राज्य सरकारने "ब्रेक दि चेन' म्हणत कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाउन करत जनतेची फसवणूक केली असल्याचे मत भाजप संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते - पाटील यांनी व्यक्त केले. 

धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, जनतेला फसवत सरकारने केला निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाउन !

sakal_logo
By
शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : राज्य सरकारने "ब्रेक दि चेन' म्हणत कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाउन करत जनतेची फसवणूक केली असल्याचे मत भाजप संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते - पाटील यांनी व्यक्त केले. 

कोरोनाची लाट आटोक्‍यात आणण्यासाठी राज्य सरकारने वीकएंड लॉकडाउन जाहीर केला आणि लगेचच ब्रेक दि चेन म्हणत कडक निर्बंधाच्या नावाखाली संपूर्ण लॉकडाउनच केला. याबाबत पत्रकारांशी बोलताना मोहिते-पाटील म्हणाले, अचानक संपूर्ण लॉकडाउन केल्याने लहान व्यावसायिक, शेतकरी आणि सामान्यांमध्ये एक कमालीची अस्वस्थता पसरली आहे. गेल्या वर्षीपासूनच्या लॉकडाउनमुळे हॉटेल रेस्टॉरंट, चहा कॅन्टीन, ब्यूटी पार्लर, हेअर सलून, टपरीधारक, खेळणी दुकाने, कापड दुकाने, भांडी दुकाने या व्यवसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

सर्वच दुकानदार व व्यावसायिकांचे अर्थकारण कोसळले आहे. लॉकडाउनमध्ये थकलेल्या कर्जाचे हप्ते, कर्जाच्या व्याजाचे हप्ते, थकीत वीजबिल, दुकानातील कामगारांचा पगार, घरप्रपंच, मासिक खर्च सुद्धा त्यांना भागवणे अशक्‍य होत आहे. त्यामुळे हा खर्च भागवण्यासाठी सुद्धा पुन्हा व्यावसायिकांना कर्जच काढावे लागत आहे. त्यामुळे हा नवीन निर्बंधरूपी लॉकडाउन व्यापाऱ्यांसाठी जीवघेण्या संकटापेक्षा कमी नाही. माणुसकीच्या दृष्टिकोनातून व्यापारी व व्यावसायिकांचा विचार राज्य सरकारने करायला हवा आणि निर्बंध मागे घेऊन तत्काळ नव्याने अधिसूचना जाहीर करावी, असेही मोहिते- पाटील म्हणाले. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या एक वर्षापासून आहे. कोरोनाचा अटकाव करायचा असेल तर सक्षम आरोग्य यंत्रणा उभी केली पाहिजे. निर्बंधाच्या नावाखाली दिशाभूल करत शेतकरी, व्यापारी व व्यावसायिकांवर लॉकडाउन लादून कोरोना कमी होणार नाही, हे शासनाने लक्षात घ्यायला हवे. छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी व जनसामान्यांचे हित लक्षात घेऊन नवीन अधिसूचना जारी करावी. 
- धैर्यशील मोहिते-पाटील, 
संघटन सरचिटणीस, भाजप 

संपादन : श्रीनिवास दुध्याल