विमानसेवेचा स्पिन ऑफ इफेक्‍ट! जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले विकासाचे नियोजन

विमानसेवेचा स्पिन ऑफ इफेक्‍ट! जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले विकासाचे नियोजन
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरCanva

तुम्हाला भोवरा माहिती आहे का! तो ज्या वेळी फिरतो त्या वेळी तो एकटाच फिरत नाही तर त्याच्या बाजूचीही हवा फिरवतो. विमानसेवेचेही तसेच आहे.

सोलापूर : तुम्हाला भोवरा माहिती आहे का! तो ज्या वेळी फिरतो त्या वेळी तो एकटाच फिरत नाही तर त्याच्या बाजूचीही हवा फिरवतो. विमानसेवेचेही (Airlines) तसेच आहे. सध्या "टाईम इज मनी' आहे. सोलापूरला सर्व काही आहे परंतु विमानसेवा नाही. सोलापूरची हीच गरज ओळखून आम्ही विमानसेवेला प्राधान्य दिले आहे. होटगी रोड विमानतळाशेजारील सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar Factory) चिमणी सर्वच पातळ्यांवर बेकायदेशीर ठरली आहे. ती हटविण्याची कार्यवाही महापालिका करत आहे. बोरामणी विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जमीन निर्वणीकरणाची प्रक्रिया अंतिम आहे. सोलापूरची विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी "कॉफी विथ सकाळ' (Coffee With Sakal) मध्ये दिली. विमानसेवेमुळे सोलापुरात इतर रोजगार सुरू होतील, विमानसेवेचा "स्पिन ऑफ इफेक्‍ट' सोलापूरला मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले. (District Collector Milind Shambharkar said the airline would have a spin-off effect on Solapur-ssd73)

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
सोलापुरात 360 संशयितांमधून 92 जणांना डेंगी !

"बोरामणी'चे भूसंपादन पूर्ण

बोरामणी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (International Airport) भूसंपादनासाठी आलेला निधी वाटप केला आहे. काही गटांमध्ये वाद होते. त्यांची रक्कम न्यायालयात जमा केली आहे. जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. निर्वणीकरणाचाही विषय अंतिम टप्प्यात आहे. सोलापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची केळी, डाळिंब, सीताफळ, द्राक्षांचे उत्पादन होते. बोरामणी येथील कार्गो विमानतळामुळे (Cargo airport) सोलापूरच्या शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळेल. किसान रेलच्या माध्यमातून सोलापूरचा शेतमाल देशपातळीवर पोचू लागला असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

पर्यटनवाढीला प्राधान्य

सोलापूर जिल्ह्याला आध्यात्मिक पर्यटनाची (Spiritual tourism) व निसर्ग पर्यटनाची (Nature tourism) मोठी संधी आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून (Pilgrimage development plans) पंढरपुरातील (Pandharpur) विष्णूपद, पुंडलिक मंदिर यासह या परिसराच्या विकासासाठी वाढीव निधी मिळाला आहे. सोलापूर शेजारी असलेल्या हिप्परगा तलावाच्या ठिकाणी पर्यटनाची सुविधा व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharne) यांच्या माध्यमातून जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांच्याकडे बैठक लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उजनी परिसराच्या पर्यटन विकासाचेही प्रयत्न सुरू आहेत. कुरनूर तलावाचेही सुशोभीकरण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
कोरोना ग्राफ ! पहिल्या लाटेत 1844 तर दुसऱ्या लाटेत 2669 बळी

सोलापूरला प्रचंड भविष्य

सोलापूरला रेल्वेची चांगली सुविधा आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच महामार्गांचे चौपदरीकरण झाले आहे. सोलापूर मेडिकल हब (Solapur Medical Hub) म्हणूनही पुढे येत आहे. सोलापुरातील शिक्षणाची चांगली सुविधा आहे. उद्योगासाठी लागणारे मनुष्यबळही सोलापुरात आहे. येत्या काळात सोलापुरात विमानसेवा सुरू झाल्यानंतर सोलापुरात आणखी नवीन उद्योग येतील. सोलापूरला चांगले भविष्य असल्याचे मतही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक अन्‌ सोलापूर सारखेच

नागपूरमधील (Nagpur) शासकीय तंत्रनिकेतनमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. या परीक्षेसाठी पदवी आवश्‍यक असल्याने बीएची पदवी घेतली. पहिल्याच प्रयत्नात उपजिल्हाधिकारी पदाची संधी मिळाली. "आयएएस'साठी प्रयत्न केला. उत्तीर्ण झालो परंतु शेवटची रॅंक मिळाली. त्यामुळे उपजिल्हाधिकारी पदाची नोकरी स्वीकारली. काही वर्षांनी "आयएएस'चे प्रमोशन झाले. त्यानंतर पहिली सेवा नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केली. नाशिकमध्ये असलेले वातावरण आणि सोलापूरचे वातावरण सारखेच असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
तिसऱ्या लाटेत एका दिवसात 35 हजार रुग्ण असतील अ‍ॅक्‍टिव्ह

तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी

पहिल्या लाटेत कोरोना (Covid-19) सर्वांनाच नवीन होता. ज्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरवातीच्या टप्प्यात आला त्या वेळी सोलापूर, यवतमाळ, जळगाव येथील जिल्हा प्रशासनावर आरोप झाले. दुसऱ्या लाटेत मात्र आम्हाला कोरोनाचा अंदाज आला. आता तिसऱ्या लाटेची आवश्‍यक ती तयारी पूर्ण झाली आहे. बेडची उपलब्धता, मुबलक ऑक्‍सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. बेड कितीही केले तरी ते केव्हा ना केव्हा संपणारच आहेत. नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसताच उपचार घ्यायला सुरवात करावी. अंगावर दुखणे काढून शेवटच्या टप्प्यात उपचार घेण्याची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले आहे.

चित्रनगरी, एमआयडीसीचा वेगळा अनुभव

उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर नागपूर येथे प्रांताधिकारी, वर्धा येथे निवासी उपजिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा, गोरेगाव येथील चित्रनगरी, मुंबई महापालिका, एमआयडीसीमध्ये पुनर्वसन विभागाचा प्रमुख, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे व तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांचा पीएस म्हणून काम करण्याची संधी मिळाली. चित्रनगरी आणि एमआयडीसी या ठिकाणची सेवा व इतर सेवा यामध्ये खूप फरक होता. चित्रनगरी आणि एमआयडीसीमध्ये व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सेवा करावी लागत होती. या दोन विभागांतील सेवेचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

"सामाजिक न्याय भवन' साकारले

तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या काळात राज्यातील सामाजिक न्याय विभागाशी निगडित असलेली जिल्हा पातळीवरील सर्व कार्यालये, आर्थिक विकास महामंडळे एकाच ठिकाणी आणण्याचा निर्णय झाला. त्यासाठी सामाजिक न्याय भवन ही संकल्पना पुढे आली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय भवन असावे व महसूल विभागाच्या ठिकाणी मुलींचे एक हजार क्षमतेचे वसतिगृह करण्याचाही निर्णय झाला. या दोन्ही निर्णयांना मूर्त स्वरूप देण्यासाठी, जागा बघण्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com