esakal | बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनाचा धोका कमीच ! चिमुकल्यांमध्ये रोगप्रतिकारकशक्‍ती सर्वाधिक
sakal

बोलून बातमी शोधा

बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनाचा धोका कमीच !

12 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये अन्य वयोगटापेक्षा रोगप्रतिकारकशक्‍ती अधिक असल्याने त्या मुलांना कोरोनाचा फारसा धोका जाणवणार नाही.

बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनाचा धोका कमीच !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दोन्ही लाटांनंतर आता तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविण्यात आली असून, लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. परंतु, 12 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये अन्य वयोगटापेक्षा रोगप्रतिकारकशक्‍ती (Immunity) अधिक असल्याने त्या मुलांना कोरोनाचा फारसा धोका जाणवणार नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjiv Thakur) यांनी दिली. परंतु, कोरोना (Corona) होऊन गेल्यानंतर त्यांना 'मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम'बद्दल (Multi-system inflammatory syndrome - MIS-C) खबरदारी घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: सुलतानपूरचे 'राहुलनगर'! अखेर शहीद राहुल शिंदेंना मिळाला न्याय

तिसऱ्या लाटेत 0 ते 12 वयोगटातील मुलांपैकी केवळ दोन ते तीन टक्‍के मुलांसाठी कोरोना प्राणघातक ठरू शकतो, असेही डॉ. ठाकूर म्हणाले. 13 ते 17 वयोगटातील मुलांना थोडासा धोका अधिक राहील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यासाठी कोरोना होणार नाही, याची दक्षता मुलांबरोबरच पालकांनीही घ्यायला हवी. दरम्यान, मुलांचा धोका कमी करण्यासाठी स्टिरॉईड व इम्यूनोग्लोब्युलिन हे इंजेक्‍शन मुबलक प्रमाणात असल्याचेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना काळात मुले घरीच असल्याने त्यांचे पोषण व्यवस्थित झाले असून, त्यांच्या दैनंदिन जीवनात संतुलित पौष्टिक आहाराचा वापर होऊ लागला आहे. लहान मूल जन्मल्यानंतर त्याला 10 ते 16 वयोगटापर्यंत नियमित लसीकरण केले जाते. त्यामुळेही त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्‍ती टिकून राहते, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली शिरशेट्टी यांनी सांगितले.

अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्‍ती

  • प्रथिनेयुक्‍त संतुलित आहाराचा वापर दैनंदिन करावा

  • सूर्यनमस्कार, योगा, सायकलिंग, बास्केट बॉलसह अन्य खेळ

  • दैनंदिन आहारात उसळी, डाळी, कडधान्याचा वापर असावा

  • फळे चावून खावीत, ज्यूस नकोच; अंडी, मटण प्रमाणात खावे

  • पालेभाज्या खाव्यात, ऊस चावून खावा

हेही वाचा: कोरोनाला त्याने हरविले, मात्र आता कसरत दवाखान्याच्या बिलासाठी!

MIS-C ची लक्षणे...

  • 24 तासांपेक्षा अधिक काळ अंगात ताप राहणे

  • डायरियाचा त्रास होतो; छातीत वारंवार दुखणे

  • डोळे लाल होतात, अंगावर लाल पुरळ येतात

  • अंगावर विशेषत: जीभ, ओठावर सूज येते

  • पोटदुखी, डोकेदुखी, थकवा, चक्‍कर येते; हृदयाचे ठोके वाढतात

कोरोना होऊन गेल्यानंतर मुलांमध्ये म्युकरमायकोसिसप्रमाणे "मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम'ची समस्या दिसू लागली आहे. तीन ते सहा आठवड्यांनंतर या आजाराची लक्षणे दिसतात. त्यासाठी पालकांनी वेळोवेळी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार सुरू ठेवावेत.

- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

loading image
go to top