
बार्शी : शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बार्शी-परांडा रस्त्यावर अमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची माहिती १७ एप्रिल रोजी समजताच पोलिसांनी साफळा रचून पेट्रोलपंपासमोर थांबलेल्या कारवर छापा टाकला. या कारवाईत दोन लाख रुपयांचे मॅफेड्रान (एमडी), गावठी पिस्तूल, तीन जिवंत राउंड, रोख आठ हजार रुपये, कार असा तेरा लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी सुरवातीला तिघांना अटक केली होती. त्यानंतर आणखी तिघांना पोलिसांनी अटक केली. तसेच तपासात आणखी पाच जण सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी एकास अटक केली आहे. यात एकास न्यायदंडाधिकारी व सहा जणांना जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.