यंदा "दुरूनच जावई साजिरे'! कोरोनामुळे जावयांचा धोंड्याचा मानपान पडला पार गळून 

Javai
Javai
Updated on

मानेगाव (सोलापूर) : मोठ्या थाटामाटात मिळणारा जावयाला धोंड्याचा मानपान यावर्षी प्रचंड प्रमाणात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे पार गळून पडला आहे. त्यामुळे यावर्षी सर्व जावईबापूंचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. जावई वर्गातून कुठेतरी आनंदावर विरजण पडल्याची भावना व्यक्त होत आहे. 

धोंड्याचा महिना म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्वच जावईबापूंसाठी एक पर्वणीच असते. धोंड्याच्या महिन्यानिमित्त अनेक जावईबापू सासरवाडीला जाण्यास इच्छुक असतात. या महिन्याच्या अनेक रूढी-परंपरा आहेत. या महिन्यात जावयाला दीपदान केले जाते. मात्र सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबलेल्या आहेत. नवीन लग्न झालेल्या जावई व लेकीला पहिल्या धोंड्याच्या महिन्यात अंगठी घालण्याची प्रथा आहे. मात्र, कोरोनामुळे या सर्व रूढी-परंपरेला ब्रेक लागलेला आहे. 

धोंड्याच्या महिन्यात जावयाला नाराज करायचे नाही म्हणून सासरेबुवा ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या धोंड्याच्या महिन्यामध्ये सासरेबुवांकडून जावयाला व मुलीला तेहतीस अनारसेंचं दान दिले जाते; तसेच तेहतीस धोंडे दिले जातात. याबरोबरच जावईबापूला व लेकीला कपडे केले जातात. त्यांना पुरणपोळीचं जेवण दिले जाते. या रूढी-परंपरा वर्षानुवर्षे हिंदू संस्कृतीमध्ये चालत आल्या आहेत. धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास दर तीन वर्षांनी येतो. या वर्षीचा अधिक महिना हा तर 160 वर्षांनी अधिक अश्विन हा योग आला आहे. त्यामुळे हा महिना अतिशय पुण्यपर्वणीच अशा प्रकारचा मानला जातो. मात्र कोरोनाचे मोठे संकट यंदा उभा राहिले आहे. त्यामुळे बाहेर जाणे-येणे धोक्‍याचे ठरत आहे. त्यामुळे यंदा धोंड्याच्या महिन्याच्या असणाऱ्या पारंपरिक प्रथा थांबवाव्या लागणार आहेत. कोरोनामुळे "दुरूनच जावई साजिरे' असं म्हणण्याची वेळ सासरेबुवांवर यंदा आली आहे. तसेच सासरेबुवांची देखील डोकेदुखी काही प्रमाणात कमी झाली आहे, असेच म्हणावे लागेल. 

धोंड्याचा महिना हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. यंदाचा हा महिना तर 160 वर्षांनी अधिक अश्विन असा योग आला आहे. हा महिना मोठा पवित्र असल्याने या महिन्यात 33 अनारसे दान करावेत. 
- मोहन दाते, दाते पंचागकर्ते, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Police
Floating Solar Power Project Planned At Solapur Hipparga Lake To Generate Electricity Worth Rs 1 Crore Every Year
solapur city police
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com