कोरके यांच्या आठ आश्रमशाळांवर प्रशासक ! गंभीर अनियमितता; संस्थांची मान्यता रद्दची होणार कार्यवाही
सोलापूर : बार्शी तालुक्यातील जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था, सर्जापूर व जय कालिका माता शिक्षण प्रसारक मंडळ, पानगाव संचलित आठ आश्रमशाळांवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने दिला आहे. प्रशासक म्हणून सोलापूरच्या समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेब कोरके यांच्या संस्थांना मोठा धक्का बसला आहे.
जय जगदंबा बहुउद्देशीय संस्थेशी संलग्नित असलेली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक आश्रमशाळा, सर्जापूर, माध्यमिक आश्रमशाळा, सर्जापूर, मातोश्री सुंदराबाई नरहरी कोरके कनिष्ठ महाविद्यालय, सर्जापूर, प्राथमिक आश्रमशाळा जामगाव (ता. माढा) व माध्यमिक आश्रमशाळा जामगाव (ता. माढा) या पाच संस्था व जय कालिका माता शिक्षण प्रसारक मंडळ, पानगाव संचलित प्राथमिक आश्रमशाळा वैराग, माध्यमिक आश्रमशाळा, वैराग, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वैराग या तीन अशा एकूण आठ संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जय जगदंबा व जय कालिका माता या संस्थांमध्ये गंभीर स्वरूपाची अनियमितता असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
आश्रमशाळा संहिता, शासन निर्णय, शासन परिपत्रक याबाबत संस्था तसेच शाळेकडून पालन होत नाही. सोयीसुविधा, प्रवेशितांचे आरोग्य, सुरक्षितता, शैक्षणिक दर्जा, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसणे असा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच याबाबत मुख्याध्यापक व संस्थापकांना समर्पक खुलासा करता आलेला नाही. इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालकांनी या आश्रमशाळांची मान्यता रद्द करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची सूचनाही इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालयाने केली आहे.
अशी केली शासनाची फसवणूक
संस्थापक बाळासाहेब नरहरी कोरके यांच्या नावाने इमारत नसताना देखील 1997 पासून ते 2014 पर्यंत शासनाला खोटे भाडे प्रमाणपत्र देऊन शासनाकडून भाडे उचलण्यात आले आहे. आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन कर्मचाऱ्यांची नावे न काढता मुख्याध्यापकांच्या नावे काढून सर्व रक्कम हडप केली जाते. आश्रमशाळेची एकच इमारत शासनाच्या तीन वेगवेगळ्या विभागांना दाखवून तीनही विभागांकडून शासनाचे अनुदान लाटले जाते. आश्रमशाळेचे परिपोषण अनुदान, वेतनेतर अनुदानाचा व्यवहार आश्रम शाळेच्या खात्यावर चेकने न करता संस्थापक स्वतः काढून उचलतात, व्हॅट व जीएसटी न भरता खोट्या पावत्या करून ऑडिट करतात, कनिष्ठ महाविद्यालय वैराग व कनिष्ठ महाविद्यालय सर्जापूर येथे क्रॉप सायन्स व कॉम्प्युटर सायन्ससाठी व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश न देता लातूर व नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना प्रवेश दिले जात असल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.