Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना अडीचशे कोटींचा फटका

सोलापूर बाजार समितीमधील डिसेंबर महिन्यातील स्थिती, इतर घटक मात्र मालामाल
due to onion export ban farmers hit 250 cr loss agriculture solapur
due to onion export ban farmers hit 250 cr loss agriculture solapuresakal

- संदीप गायकवाड

उ. सोलापूर : यंदाच्या कांदा हंगामात आत्तापर्यंत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ६२५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा कांदा विक्री झाला. यातून बाजार समितीला जवळपास सहा कोटी २५ लाख रुपयांचा सेस तर अडत्यांना ३७ कोटी रुपयांचा नफा झाला.

लाख रुपये हमालांना त्यांच्या घामाच्या रूपाने तीन कोटींपेक्षा जास्त मिळाले तर स्त्री हमाल, तोलार, कांदा वाहतूक करणारे वाहतूकदार हे सर्वच घटक मालामाल झाले. मात्र केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या धोरणामुळे लुटला गेला तो फक्त शेतकरी. डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना सुमारे अडीचशे कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

राज्यात नाहीतर देशात रब्बी कांदा विक्रीमध्ये सोलापूर बाजार समितीचा नावलौकिक आहे. गेल्या चार महिन्याच्या कालावधीत राज्यात सर्वात जास्त कांदा आवक ही सोलापूर बाजार समितीमध्ये झाली आहे.

या कांदा विक्रीतून बाजार समितीला सेस, बाजार फी व इतर कराच्या रूपाने कोट्यवधी रुपयांचा लाभ झाला. बाजार समितीत दररोज शेकडो छोट्या व मोठ्या वाहनातून कांद्याची आवक होते. जवळपास सर्वच कांदा वाहतूकदार प्रतिकांदा पिशवी भाडे शेतकऱ्यांकडून वसूल करतात,

त्याचबरोबर या वाहतूकदारांना अडत्यांकडून कमिशन मिळते ते वेगळेच. शहरा जवळील गावातील छोट्या कांदा वाहतूकदारांनी दररोज किमान दोन ते तीन खेप कांदा बाजारात आणला. यावर्षीच्या विक्रमी आवकीमुळे वाहतूकदारांसाठी हा हंगाम सुवर्णकाळ ठरला आहे.

बाजारात आलेला कांदा उतरवून घेणे व विक्री झालेला कांदा परत मोठ्या गाडीत चढविणे, यासाठी मोठ्या प्रमाणात हमाल वर्ग काम करत आहे. यामध्ये कांदा उतरवून घेणाऱ्या हमालांची रक्कम ही प्रतिक्विंटल निश्चित आहे.

मात्र कांदा चढविणाऱ्या हमालांनी यावर्षी व्यापाऱ्यांकडून मनमानेल त्या पद्धतीने पैसे वसूल केले आहेत. हा हमाल वर्ग संघटित असल्यामुळे व्यापारी गप्प बसून पैसे मोजत आहे. यावर्षी कांदा बाजारात सर्वांची दिवाळी होत असताना ज्याच्या जिवावर हा सारा उद्योग उभारला आहे, त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र शिमगा करण्याची वेळ आली आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामातील कांद्याला सुरवातीला समाधानकारक दर मिळाले नाहीत. मात्र ऑक्टोबर महिन्यात अचानक दरामध्ये मोठी वाढ झाली. या तेजीची धास्ती घेत केंद्र सरकारने कांद्यावर सरसकट निर्यात बंदी घातली.

परिणामी डिसेंबर महिन्यात अक्षरशः कवडीमोल दराने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. सरकारच्या निर्णयामुळे सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यालाच बसला आहे. इतर घटकांना मात्र अपवाद वगळता कुठलाही परिणाम झाला नाही.

इतर सर्व घटक मालामाल

बाजार समिती (सेस व देखरेख फीच्या माध्यमातून) ः नऊ कोटी २५ लाख

अडत्यांची कमाई : ३७ कोटी ५० लाख ९२ हजार ७९९

कांदा पिशवीचे वजन करणारे हमाल ः २ कोटी ३१ लाख ६८ हजार

स्त्री हमाल : ५४ लाख ५० हजार ९७०

शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडाले

९ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने अचानक कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला. यामुळे कांद्याच्या दरात फार मोठी घसरण झाली. बाजार समितीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेने डिसेंबर महिन्यात कांदा दर निम्म्याहून कमी आला. याचा फटका उत्पादकांना बसला असून ही आकडेवारी पाहता अडीचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्याच्या खिशातून काढून घेतली गेली आहे.

सोलापूर बाजार समितीतील चार महिन्यांची स्थिती

सप्टेंबर

कांदा आवक ः दोन लाख ९५ हजार ७४ क्विंटल

किमान दर ः १०० तर कमाल ३३०० रु., प्रति क्विंटल सरासरी दर १६०० रु.

एकूण विक्री ः ४७ कोटी ५८ लाख ६८ हजार २०० रु.

ऑक्टोबर

कांदा आवक ः चार लाख ५८ हजार ६७६ क्विंटल

किमान दर ः १०० तर कमाल ८५०० रु., प्रतिक्विंटल सरासरी दर २४०० रु.

एकूण विक्री ः १०६ कोटी ३७ लाख ७२ हजार २५० रु.

नोव्हेंबर

कांदा आवक ः सात लाख २५ हजार १६८ क्विंटल

किमान दर ः १०० तर कमाल ८००० रु., प्रतिक्विंटल सरासरी दर ३००० रु.

एकूण विक्री : २१६ कोटी ६८ लाख ३४ हजार ३०० रु.

डिसेंबर

कांदा आवक ः १३ लाख ४६ हजार ५६७ क्विंटल

किमान दर ः १०० तर कमाल ५१०० रु., प्रतिक्विंटल सरासरी दर १६०० रु.

एकूण विक्री : २५४ कोटी ५०लाख ७१ हजार ९०० रु.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com