esakal | श्रावण न पाळणारे खवय्ये खूश ! भाजीपाल्याच्या दरात मिळताहेत मासे
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावण न पाळणारे खवय्ये खूश ! भाजीपाल्याच्या दरात मिळताहेत मासे

उजनी पाणलोट परिसरात बारमाही मासेमारी सुरू असली तरी, सध्या श्रावण महिना सुरू असल्याने माशांना मागणी कमी प्रमाणात आहे.

श्रावण न पाळणारे खवय्ये खूश! भाजीपाल्याच्या दरात मिळताहेत मासे

sakal_logo
By
राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

केत्तूर (सोलापूर) : उजनी (Ujani Dam) पाणलोट परिसरात बारमाही मासेमारी (Fishing) सुरू असली तरी, सध्या श्रावण महिना सुरू असल्याने माशांना (Fish) मागणी कमी प्रमाणात आहे. त्यामुळे माशांचे दर मात्र नीचांकी पातळीवर गेले आहेत. सध्या भाजीपाल्याच्या दरात माशांची विक्री केली जात आहे. एरव्ही 120 ते 130 रुपये दराने मिळणारे मासे सध्या भिगवण मच्छी मार्केटमध्ये (Bhigwan Fish Market) केवळ 18 ते 20 रुपये किलो या दराने विकले जात आहेत. स्थानिक बाजारात मात्र हेच दर 50 ते 60 रुपये किलो असे आहेत.

हेही वाचा: आता माळशिरस तालुका आला राजकारणाच्या केंद्रस्थानी!

सध्या माशांची स्वस्ताई असल्याने श्रावण न पाळणारे खवय्ये मात्र माशांचा आनंद घेत आहेत. उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ होणे बंद झाल्याने मासे सापडण्याचे प्रमाणही अल्प प्रमाणात झाले आहे. त्यातच छोटे मासे सापडत आहेत. इतर जातीचे (रहू, काणस, वाम, गुगळी, शिंगटा, वडशिवडा, चांभारी आदी) मासेही सापडणे दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे मच्छिमार संकटात सापडले आहेत. सध्या मच्छिमारांना जलाशयामध्ये चिलापी जातीचेच मासे सापडत आहेत. श्रावण महिना संपल्यानंतर पुन्हा एकदा गौरी-गणपती सण असल्याने हे सर्व सण संपल्यानंतरच माशांचे दर वाढण्याचे संकेत आहेत.

हेही वाचा: शाळा बंदमुळे दुष्टच्रकात भावी पिढी! दोन लाख विद्यार्थी प्रवाहाबाहेर

सध्या माशांचे दरही नीचांकी पातळीवर गेले असल्याने मासे खाण्याकडे कल वाढला आहे. श्रावण महिना संपल्यानंतर पुन्हा माशांचे दर वाढणार आहेत.

- गणेश चव्हाण, ग्राहक, केत्तूर

आधीच धरणात मासे सापडत नाहीत. त्यात दर कमी झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरवर्षी श्रावण महिन्यात माशांचे दर कमी होतात. त्यामुळे मच्छिमारी व्यवसाय करणे परवडत नाही.

- नितीन पतुले, मच्छिमार, केत्तूर

माशांची निर्यातही अद्याप सुरू झालेली नाही. व्यापारीही आम्हाला योग्य दर देत नाहीत. त्यामुळे सध्या स्थानिक बाजारात माशांचे दर कमी झाले आहेत.

- दत्तात्रय डिरे, व्यापारी, केत्तूर

मच्छी मार्केटला माशांचे दर कमी असल्याने तिकडे विक्रीसाठी मासे घेऊन जाणे परवडत नाही. त्यामुळे स्थानिक बाजारातच माशांची विक्री करावी लागत आहे.

- पद्मेश नगरे, मच्छिमार

माशांचे सध्याचे दर (कंसात पूर्वीचे दर)

  • चिलापी (लहान) 18 ते 20 (35 ते 40)

  • (मध्यम) 30 ते 40 (70 ते 80)

  • (मोठा) 50 ते 60 (130 ते140)

loading image
go to top