Covid-19 : मकर संक्रांतीपूर्वी शाळा होणार बंद? सात दिवसांत वाढले दीड लाख रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मकर संक्रांतीपूर्वी शाळा होणार बंद? सात दिवसांत वाढले दीड लाख रुग्ण
मकर संक्रांतीपूर्वी शाळा होणार बंद? सात दिवसांत वाढले दीड लाख रुग्ण

मकर संक्रांतीपूर्वी शाळा होणार बंद? 7 दिवसांत वाढले दीड लाख रुग्ण

सोलापूर : कोरोना (Covid-19) रुग्णवाढीचा वेग चिंताजनक असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावेच लागणार आहे. राज्यात 1 ते 7 जानेवारी या सात दिवसांत एक लाख 55 हजार 401 रुग्ण वाढले आहेत. कमी झालेला कोरोनाचा जोर पुन्हा वाढल्याने शाळा बंद करण्यासंदर्भातील निर्णय पुढील आठवड्यात (सोमवारी) घेतला जाणार आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पुणे (Pune) यासह काही जिल्ह्यांमध्ये डिसेंबरच्या तुलनेत रुग्णवाढ दुप्पट झाली आहे. दुसरीकडे ओमिक्रॉनचेही (Omicron) रुग्ण आढळत असून आतापर्यंत राज्यात ओमिक्रॉनचे 876 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 435 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (Due to the increasing prevalence of Corona, schools may close before Makar Sankranti)

हेही वाचा: स्टार्टअप्स देणार 20 लाख लोकांना रोजगार! असा आहे सरकारचा प्लॅन

राज्यात एक लाखाहून अधिक शाळा असून त्याअंतर्गत सव्वादोन कोटी विद्यार्थी प्रवेशित आहेत. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या दोन हजार 796 शाळा (ZP School) असून त्याअंतर्गत साडेतीन लाख विद्यार्थी शिकत आहेत. दुसरीकडे, माध्यमिकच्या एक हजार 87 शाळा असून, त्यामध्ये जवळपास सव्वाचार लाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. दिवाळीनंतर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा सुरळीत सुरू होत्या. मात्र, नववर्षाच्या सुरवातीपासूनच कोरोनाचा संसर्ग वाढत असून ओमिक्रॉनचेही रुग्ण वाढत आहेत.

तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका 18 वर्षांखालील मुलांनाच असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मुंबई, पुण्यात रुग्ण वाढत असल्याने तेथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने शाळेत विद्यार्थी उपस्थित राहणे सद्य:स्थितीत धोकादायक समजले जात आहे. पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा अंदाज घेऊन संबंधित जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाने शाळा बंदचा निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारने (Maharashtra State Government) स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांमधील अनुभव पाहता, जिल्ह्यातील शाळा मंगळवारी किंवा शुक्रवारपासून बंद केल्या जाणार आहेत. दरम्यान, या मुलांना पुन्हा एकदा शिक्षणाचे ऑनलाइन धडे दिले जाणार आहेत.

जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन शाळा पूर्णपणे बंद करण्यासंदर्भात सोमवारी (ता. 10) निर्णय घ्यावा, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार आगामी दोन दिवसांतील रुग्णवाढ पाहून सोमवारी किंवा मंगळवारी शाळा बंद करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांच्याशी चर्चा करून शाळा बंद संदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

- दिलीप स्वामी (Dilip Swami), मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

हेही वाचा: 'या' बॅंकेत PO अन्‌ लिपिक पदांची भरती! 11 जानेवारीपर्यंत करा अर्ज

दहावी-बारावीच्या परीक्षेचा जानेवारीखेरीस निर्णय

दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्णपणे शिकवून झाला. तरीही, सध्या ऑनलाइन पद्धतीने शिकवलेला अभ्यासक्रम पुन्हा ऑफलाइन शिकवला जात आहे. परंतु, कोरोनासोबतच ओमिक्रॉनचाही धोका वाढल्याने ऑफलाइन वर्ग पूर्णपणे बंद केले जाणार आहेत. दरम्यान, बोर्डाच्या वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक (तोंडी) परीक्षा 14 फेब्रुवारीपासून तर बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारीपासून नियोजित आहे. बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल, तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या काळात होणार आहे. मात्र, कोरोना संसर्गाची संभाव्य स्थिती पाहून वेळापत्रकात बदल होऊ शकतो. त्यासंदर्भातील निर्णय जानेवारीअखेरीस जाहीर केला जाणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top