पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे माळशिरस तालुक्‍यात लाळ-खुरकतचे लसीकरण मंद गतीने ! 

janavaranche lasikaran
janavaranche lasikaran

पिलीव (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील पिलीव भागासह सर्वच ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे लाळ, खुरकत या रोगाचे लसीकरण मंद गतीने सुरू आहे. 

माळशिरस तालुक्‍यात 2012 च्या पशू गणनेनुसार (2018 ला झालेल्या पशुगणनेची संख्या अद्याप आलेली नाही) एक लाख 79 हजार 605 जनावरे आहेत. त्यामध्ये एक लाख 16 हजार 572 गाय वर्ग आणि 63 हजार 033 म्हैस वर्ग जनावरे आहेत. गाय वर्गामध्ये मोठ्या गायी 95 हजार 420 आहेत तर वासरे 21 हजार 152 आहेत. म्हैस वर्गामध्ये मोठी 49 हजार 295 आणि लहान 13 हजार 738 आहेत. 

तालुक्‍यात पशुवैद्यकीय दवाखाने 31 आहेत. यामध्ये श्रेणी एक आणि श्रेणी दोनचा समावेश आहे. श्रेणी एकमध्ये पशुधन विकास अधिकारी हे मुख्य पद असून ते पिलीव, कोंडभावी, महाळुंग, संगम, नातेपुते आणि मळवली या सहा गावांत रिक्त आहेत. तर श्रेणी दोनच्या दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक हे मुख्य पद असते ते 12 पैकी तांदूळवाडी, वेळापूर, तांबवे, इस्लामपूर आणि दहिगाव या पाच गावांत रिक्त पद आहे. तालुक्‍यातील अशा 11 गावांमध्ये मुख्य पदेच रिक्त आहेत. याचा परिणाम लसीकरणावर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये वरिष्ठ पातळीवरून आदेशही जलद निघाला आहे, पण या जलद आदेशाला कृती मात्र मंद गतीने सुरू आहे. 

पशुसंवर्धन खात्याकडून प्रत्येक वर्षी लाळ-खुरकत लसीकरण मोहीम राबविण्यात येते. वर्षामध्ये जुलै व नोव्हेंबरमध्ये दोनवेळा मोफत लसीकरण करण्यात येते. मात्र या खात्याकडून मंद गतीने लसीकरण होत राहिल्याने जनावरांना रोगाची लागण होईल. पशुसंवर्धन खात्याकडून लाळ-खुरकत लसीकरण मोहीम राबविण्यासाठी विलंब झाल्याने रोगाची बाधा वाढण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. हा आजार खूप भयंकर असतो. या आजारामुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेक जणांचे गुरांचे गोठे जाग्यावर बसले. 

लाळ-खुरकत या आजारामुळे तोंड व खुरात जखमा होतात. त्यामुळे जनावरे चारा खाणे बंद करतात. तोंडातून लाळ गळते. जनावर चालताना लंगडते. ताप येतो. जनावरांमध्ये थकवा निर्माण होऊन कोणतेही काम करू शकत नाही आणि या आजारावर लगेच नाही उपचार केला तर जनावरही मृत्युमुखी पडते. पण हे सर्व टाळायचे असेल तर शासनाने लसीकरण जलद केले पाहिजे. 

आपण खूप दिवसांपासून रिक्त पदे भरण्याची मागणी करत आहोत आणि मी चार दिवसांपूर्वीच तालुक्‍यातील सर्व डॉक्‍टरांची मीटिंग घेऊन या लसीकरणाबाबत सूचना दिल्या आहेत. 10 डिसेंबरपर्यंत सगळे लसीकरण पूर्ण होईल. 
- अर्जुनसिंह मोहिते-पाटील,
सभापती, पंचायत समिती, माळशिरस 

तालुक्‍यात लाळ-खुरकत लसीकरण सुरू आहे. यामध्ये खासगी डॉक्‍टरच्या मदतीने आम्ही येत्या 10 दिवसांत पूर्ण लसीकरण करून घेऊ. पण रिक्त अपुऱ्या पदांमुळे आम्हाला थोडा विलंब होत आहे. - 
- डॉ.अविनाश रेडे-पाटील 
पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, माळशिरस, प्रभारी पशुधन विकासाधिकारी, पिलीव 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com