esakal | विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास वर्ग बंद ! शिक्षणाधिकारी बाबर यांचे आदेश

बोलून बातमी शोधा

School_Corona

सध्या दहावी व बारावीचे वर्ग सुरू आहेत. मात्र त्या वर्गातील विद्यार्थी कोरोना बाधित होण्याचे प्रकार वाढत आहेत. ते टाळण्यासाठी ज्या शाळेतील विद्यार्थी कोरोना बाधित आढळून येतील, त्या शाळेतील दहावी व बारावीचे वर्ग बंद करण्याचे आदेश माध्यमिकचे शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. 

विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास वर्ग बंद ! शिक्षणाधिकारी बाबर यांचे आदेश

sakal_logo
By
संतोष सिरसट

उत्तर सोलापूर : सध्या दहावी व बारावीचे वर्ग सुरू आहेत. मात्र त्या वर्गातील विद्यार्थी कोरोना बाधित होण्याचे प्रकार वाढत आहेत. ते टाळण्यासाठी ज्या शाळेतील विद्यार्थी कोरोना बाधित आढळून येतील, त्या शाळेतील दहावी व बारावीचे वर्ग बंद करण्याचे आदेश माध्यमिकचे शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. 

बुधवारी रानमसले (तालुका उत्तर सोलापूर) येथील ब्रह्मागायत्री विद्या मंदिर या शाळेतील एक विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर त्या शाळेतील एक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही कोरोना बाधित असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. त्या पार्श्‍वभूमीवर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बाबर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ज्या शाळेत कोरोना बाधित विद्यार्थी आढळून येतील, त्या शाळा बंद करून त्यांनी शाळा प्रतिबंधित करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना दिल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा या महिन्याच्या अखेरीस होत आहेत. त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दहावी व बारावीचे वर्ग सुरू आहेत. मात्र विद्यार्थ्यांची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. ज्या शाळेतील विद्यार्थी कोरोना बाधित नाहीत ते वर्ग सुरू ठेवण्याच्या सूचनाही मुख्याध्यापकांना दिले असल्याचे श्री. बाबर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे आरोग्य व त्यांचे शिक्षण या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्याकडे मुख्याध्यापकांनी योग्यप्रकारे पाहणे आवश्‍यक असल्याचे श्री. बाबर यांनी सांगितले. 

दरम्यान, बुधवारी उत्तर सोलापूर तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी कळमण येथील महात्मा गांधी विद्यालयात जाऊन पाहणी केली. त्याचबरोबर रानमसले येथील विद्यालयातही पाहणी केली. कळमण येथील जे विद्यार्थी कोरोना बाधित झाले आहेत त्यांच्याशी संपर्क आलेल्या 19 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर रानमसले शाळेतील कोरोना बाधित झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या 22 जणांची तपासणी गुरुवारी करण्यात येणार असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण विभाग या संदर्भात योग्य तो निर्णय घेत आहे. 
- भास्करराव बाबर, 
शिक्षणाधिकारी, माध्यमिक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल