
दहा वर्षांवरील 85 टक्के व्यक्तींमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्याची शक्ती
सोलापूर : शहरातील अपार्टमेंट, हौसिंग सोसायट्या, बंग्लोज, झोपडपट्ट्यांमधील एक हजार व्यक्तींमधील रक्ताचे नमुने सिरोसर्वेतून तपासण्यात आले. त्यामध्ये दहा वर्षांवरील व्यक्तींमध्ये विशेषत: लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 96.9 टक्के व्यक्तींमध्ये कोरोनाविरुध्द लढण्याची ताकद आल्याची बाब समोर आली आहे. 50 ते 69 वयोगटातील तब्बल 92 टक्के व्यक्तींमध्येही रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचे या सर्वेतून स्पष्ट झाले आहे. सामुहिक रोगप्रतिकार शक्तीमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता आता दूर झाली आहे.
शहरातील महापालिकेच्या 15 नागरी आरोग्य केंद्रांअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक परिसरातील ठरावीक वयोगटातील व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यावर मेडिकल कॉलेजमधील सुक्ष्मजीवशास्त्र व जीवरसायनशास्त्र प्रयोगशाळेत त्याची पडताळणी करण्यात आली. कोरोनाविरुध्द लढण्याची ताकद किती लोकांमध्ये आणि कोणत्या वयोगटातील व्यक्तींमध्ये आहे, याचा अभ्यास या सर्वेतून करण्यात आला. त्यात कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला व दोन्ही डोस घेतलेले, लस न घेतलेले, रक्तदाब, मधुमेह असलेले को-मॉर्बिड, दहा वर्षांवरील, आणि 50 ते 69 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचाही समावेश होता. 31 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत हा सर्वे पार पडला. त्यामध्ये लस टोचलेल्यांमध्ये सर्वाधिक तर लस न टोचणाऱ्यांमध्ये कमी प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.
कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरणावर सर्वाधिक जोर दिला जात असल्याने सामुहिक रोगप्रतिकार शक्ती तयार होऊ लागली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट धोकादायक नसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. लस टोचल्यानंतरही नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हाताची स्वच्छता या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही सर्वेच्या निष्कर्षातून करण्यात आले आहे.
सिरोसर्वेचा निष्कर्ष
- दहा वर्षांवरील 85.6 टक्के मुलांमध्ये आहे कोरोनाविरुध्द लढण्याची शक्ती
- 50 ते 59 वयोगटातील 92.2 टक्के व्यक्ती करू शकतात कोरोनाचा यशस्वी मुकाबला
- शहरातील 60 ते 69 वयोगटातील 91.5 टक्के व्यक्तींमध्ये कोरोनाविरुध्द लढण्याची ताकद
- 10 ते 19 वयोगटातील 80.9 टक्के तरुणांमध्ये आहेत कोरोनाविरुध्द लढण्याच्या ऍन्टीबॉडीज
- प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 96.9 टक्के तर एक डोस घेतलेल्या 90.9 टक्के व्यक्तींमध्ये वाढलीय रोगप्रतिकारक शक्ती
- रक्तदाब, मधुमेह असलेल्या 90.3 टक्के को-मॉर्बिड रुग्णांमध्येही आढळली रोगप्रतिकारक शक्ती
- कोरोनावरील प्रतिबंधित लस न घेतलेल्या 69.3 टक्के व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमीच
कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरणातून नागरिकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. लस न टोचलेल्यांनी लवकर लस टोचून घ्यावी. लसीकरणामुळे दोन्ही लाटेच्या तुलनेत तिसरी लाट तेवढी धोकादायक नसेल.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, वैश्यंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
Web Title: Eighty Five Percent People Fight Corona Siro Survey Results Solapur News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..