महावितरण थांबेना; आता शेतकरीही भडकला

जिल्ह्यात वीजतोडणी मोहीम सुरूच; विरोधात ठिकठिकाणी शेतकरी संघटना, राजकीय पक्ष, शेतकरी रस्त्यावर
electricity bill recovery farmer angry MSEDCL
electricity bill recovery farmer angry MSEDCL sakal

सोलापूर : अतिवृष्टी, दुष्काळ आणि गेली दोन वर्ष कोरोनामध्ये गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लगला आहे. त्यामुळे वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अचडणीचा सामना करावा लागत आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने सर्व पिके चांगली आली आहेत. यातून आर्थिक घडी बसण्याची शेतकऱ्यांना आशा होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये महावितरणने वीज तोडणीची मोहीम वेगाने सुरू केल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले असून पाणी असूनही अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देत येत नाही. एका बाजूला महावितरण वीज तोडणीवर ठाम आहे, तर दुसरीकडे शेतकरीही याविरुद्ध आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत.

शेतकऱ्यांना दिली चुकीची वीजबिले : शिंदे

माढा : महावितरण कंपनीने माढा तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या दिलेल्या चुकीच्या बिलांची तसेच वापर नसलेल्या कालावधीतील सक्तीची वसुली न थांबल्यास माढा तहसील कार्यालय व महावितरणच्या कार्यालयासमोर तालुक्‍यातील शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिला.

श्री. शिंदे म्हणाले, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे बिले देणे आवश्‍यक आहे. परंतु, अनेक शेतकऱ्यांचे कृषीपंप तीन एच.पी.चे असताना त्यांना पाच एच.पी.चे बिल दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक अन्याय झाला आहे. शासनाने अनेक वर्षापासून थकबाकी वसुलीची मोहीम राबवली नव्हती आणि आता सारखा तगादा लावला आहे. शेतकऱ्यांनी न वापरलेल्या कृषीपंपाचे वीजबिल शेतकरी भरणार कोठून? अनेकांना तर उत्पन्न मिळाले नाही. सध्या सगळीकडे कडक उन्हाळा सुरू झाला असून शेतकऱ्यांची पिके व फळबागा पाण्याला आलेल्या आहेत, अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने कृषीपंपाना २४ तास पुरेशा वीजपुरवठा करणे आवश्‍यक आहे.

शेतीचे पाणी बंद झाल्याने आर्थिक नुकसान

केत्तूर : थकीत वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठा बंद केल्याने उजनी परिसरातील काढणीला आलेली केळी पिक पाण्याअभावी मोडून पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. लवकर वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केळी उत्पादक शेतकरी करत आहे.

करमाळा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते. सध्या दरही चांगले आहे. परंतु पाण्यात अनियमितता झाल्यास याचा परिणाम पिकावर होतो. अशात गेल्या सात दिवसांपासून उजनी परिसरातील वीजपुरवठा बंद केल्याने पाण्याअभावी कापणीला आलेली केळी मोडून पडत आहे. जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे.महावितरणने वीज तोडल्याने पाणी मुबलक प्रमाणात असूनही शेतकऱ्यांना विजेअभावी पिकांना पाणी देणे अशक्‍य झाले आहे. परिणामी पिके पाण्याअभावी जळून जाणार आहेत किंवा मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

महावितरने पंधरा महिन्याचे वीजबिल एकरकमी भरण्यास सांगितले आहे. एकरकमी पैसै भरण्याइतके शेतकऱ्यांकडे पैसै नाहीत. त्यामुळे चार टप्प्यात बिलाचे हप्ते पाडून द्यावेत. वीज बंद असल्यामुळे केळीसह इतर पिकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ लागले आहे.

- अभिजीत काळे, केळी उत्पादक, पोमलवाडी, ता. करमाळा

वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी प्रसार माध्यमांद्वारे, मोबाईल संदेश पाठवून पंधरा दिवसापूर्वी शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. महावितरण ही शेतकऱ्यांची कंपनी आहे. ती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी वीजबिले भरुन सहकार्य करावे. जर ही कंपनी बंद होऊन खाजगीकरण झाले तर सर्वात मोठे नुकसान शेतकऱ्यांचे आहे.

- सुमीत जाधव, उपकार्यकारी अभियंता, करमाळा उपविभाग

बार्शी तालुक्‍यात शेतकरी झाले आक्रमक

बार्शी : बार्शी तालुक्‍यात शेतीपंप ग्राहक २८ हजार २५८ असून त्यांची सप्टेंबर २०२० रोजीची थकबाकी ३४८ कोटी रुपये आहे. कृषी धोरण २०२० नुसार व्याज व दंड माफ होवून एकूण थकबाकी २२० कोटी रुपये आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला असून तालुक्‍यातील २२२ ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता भाग्यवंत यांनी ’सकाळ’शी बोलताना दिली. दरम्यान वीजपुरवठा सुरळीत करावा म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.

ऑक्‍टोबर २०२० नंतर शेतीपंप ग्राहकांनी भरलेली रक्कम १५ कोटी रुपये आहे. भरणा झालेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम म्हणजेच ५ कोटी रुपये त्या-त्या ग्रामपंचायत स्तरावर विजेची नवीन कनेक्‍शन देण्यासाठी तसेच देखभाल दुरुस्ती व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरण्यात येत आहे. इतर ३३ टक्के रक्कम म्हणजे ५ कोटी रुपये जिल्हा स्तरावर नवीन विद्युत उपकेंद्र उभारणीसाठी, उपकेंद्रातील देखभाल दुरुस्तीसाठी वापरण्यात येत आहे. कृषीधोरणानुसार असणाऱ्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरल्यानंतर राहिलेली ५० टक्केमाफ होणार आहे. परंतु तोपर्यंतची सर्व चालू देयके भरणे बंधनकारक आहे. बार्शी तालुक्‍यांतर्गत आजपर्यंत ९४६ ग्राहकांनी कृषीधोरण अंतर्गत ३ कोटी ७ लाख भरून आपले वीजबिल कोरे केले आहे. सर्व शेतकरी बांधवांनी कृषीधोरण योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर सहभागी व्हावे, आपले वीजबिल कोरे करावे, असे महावितरण ग्रामीण उपविभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे.दरम्यान, वीज पुरवठा खंडित केल्यामुळे गुरुवारी शेतकऱ्यांनी सौंदरे येथे रास्ता-रोको आंदोलन केले तर चिखर्डे येथे वीजवितरणच्या कार्यालयाला कुलुप ठोकले. महागाव व चिखर्डे येथील शेतकरी एकत्र जमले. आम्ही बिल पूर्ण भरले असताना वीजपुरवठा खंडीत का केला असा सवाल करता कार्यालयात कुलुप ठोकले.

बार्शी तालुक्‍यातील वीजपुरवठा सुरळीत करावा : आमदार राजेंद्र राऊत

बार्शी : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आमदार राजाभाऊ राऊत यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना बार्शी तालुक्‍यातील शेतीपंपाचा खंडीत केलेला वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत ई-मेलद्वारे पत्र पाठवून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विनंती केली आहे. जर यावर यशस्वी तोडगा निघाला नाही, तर तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आघाडी सरकारच्या विरोधात अधिवेशन काळात बार्शीत भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.

बार्शी तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केली असून शेतकरी अतिवृष्टी व कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात महावितरणने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने सर्व शेतकऱ्यांचे वीजबील माफ करुन वीज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांसमवेत रास्ता रोको आंदोलन व मोर्चा काढण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत होण्याकामी संबंधितांना आदेश देण्याची विनंती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com