जानेवारीपासून अकराशे मुली-महिला बेपत्ता! काही सापडल्या तर काहींचा शोध लागेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेपत्ता महिला मुली
जानेवारीपासून अकराशे मुली-महिला बेपत्ता! काही सापडल्या तर काहींचा शोध लागेना

जानेवारीपासून अकराशे मुली-महिला बेपत्ता! काही सापडल्या तर काहींचा शोध लागेना

सोलापूर : शहर-ग्रामीणमधील मुली व महिला घरातून निघून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातून जानेवारी ते १५ नोव्हेंबर या साडेदहा महिन्यांत शहरातील जवळपास पावणेचारशे आणि ग्रामीणमधील सुमारे सातशे मुली व महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. अजूनही त्यातील अंदाजित सव्वाचारशे जण सापडलेच नाहीत.

शहरातील जुळे सोलापुरातील कल्याण नगर, सेटलमेंट फ्री कॉलनी, जुने विडी घरकुल आणि दीक्षित नगर येथील एक विवाहित महिला, एक अल्पवयीन मुलगी आणि दोन तरुणी घरातील लोकांना न सांगता बेपत्ता झाल्या आहेत. त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांत धाव घेतली आहे, परंतु अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. कुटुंबातील हरवलेला संवाद, मोबाईलचा अतिवापर आणि प्रेमातून विवाहाची फूस या प्रमुख तीन कारणांमुळे मुली-महिला बेपत्ता तथा घर सोडून निघून जाण्याचे प्रकार वाढल्याचे पोलिस अधिकारी सांगतात. कल्याण नगरातील तरुणी कपडे आणायला दुचाकीवरून घराबाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा घरी परतलीच नाही. दुसरीकडे, जुने विडी घरकुल परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. तर सेटलमेंट फ्री कॉलनी परिसरातील तरुणी घरातील कोणालाही न सांगता रात्री साडेअकराच्या सुमारास बेपत्ता झाली. दीक्षित नगरातील २० वर्षीय विवाहिता चार दिवसांपूर्वी भाजीपाला आणायला जाते म्हणून घरातून बाहेर पडली आणि पुन्हा घरी गेलीच नाही. असे ग्रामीण भागात देखील अनेक प्रकार घडले आहेत. पोलिसांना काही मुली व महिलांना शोधण्यात यश मिळाले, परंतु अजूनही काहीजणींचा शोध सुरूच आहे.

जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्यांची स्थिती

  • १ जानेवारी ते १५ नोव्हेंबर

  • ग्रामीण भाग

  • ६९७

  • शहरी भाग

  • ३७४

  • एकूण

  • १०७१

  • सापडलेल्या अंदाजित मुली-महिला

  • ४१३

१८ वर्षांवरील तरुणी-विवाहिता सर्वाधिक

१८ वर्षांखालील अल्पवयीन मुलगी-मुलगा बेपत्ता झाल्यावर त्यासंबंधी अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. कॉल केला, पैसे मागितले तर संबंधिताचा शोध सहजपणे घेता येतो. दरम्यान, पळून गेलेल्या मुली-महिलांची पुढील वाटचाल खूपच बिकट राहते. त्यांचा दुसरे लोक गैरफायदाही घेऊ शकतात. समाजात अशी अनेक उदाहरणे असतानाही अल्पवयीन मुली, सुशिक्षित मुली, विवाहित महिला घर सोडून निघून जातात, हे विशेष. पळून जाणाऱ्यांमध्ये १८ वर्षांवरील तरुणी व विवाहितांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

अल्पवयीन मुला-मुलींमध्ये कायद्याचे अज्ञान

प्रेम, विवाह, सुखी संसार अशी स्वप्ने रंगवलेली अल्पवयीन मुले-मुली अचानकपणे पसार होतात. नातेवाइकांसह पोलिसांना गुंगारा देत ते लपून-छपून राहतात. १८ वर्षे पूर्ण झाली आणि मुलगी प्रसूत झाल्यास पोलिस काहीच कारवाई करू शकणार नाहीत, हे अज्ञान अनेक अल्पवयीन मुला-मुलींमध्ये आहे. अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर कारवाई होतेच, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी दिली.