
रोजगार सेवक ते पोलिस निरीक्षक
करकंब - ‘ए, चांगला रस्ता करा रे! भविष्यात एक दिवस याच रस्त्याने माझी गाडी येणार आहे’ अशा शब्दात तो एके काळी रोजगार हमीच्या कामावर काम करताना आपल्या सहकाऱ्यांना सांगायचा. त्यावेळी सर्व मजूर हसायचे. पण आज पंधरा वर्षानंतर पोलिस निरीक्षक बनून स्वतःच काम केलेल्या रस्त्यावरून त्याची गाडी धूळ उडवत घरासमोर येऊन थांबली तेव्हा माता-पित्यांचे तर डोळे आनंदाश्रूनी डबडबलेच पण सोबतीने काम केलेले मजूरही भारावून गेले. करकंब येथील बाळासाहेब दगडू जाधव या दहावी नापास मुलाची ही कहाणी!
कैकाडी समाजात जन्मलेल्या बाळासाहेबांचे आई-वडील टोपल्या व झाप विणून संसाराचा गाडा हाकायचे. दोन मुले आणि दोन मुलींचा सांभाळ आणि शिक्षण करताना त्यांची दमछाक व्हायची. त्यातच बाळासाहेब दहावीला नापास झाला असला तरी त्याची शिक्षणाची जिद्द कायम होती. त्याने स्वतः काम करून शिकण्याची तयारी दाखविली. तेव्हा त्याच्या भावाने दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून चाकरी धरली आणि बाळासाहेबाला शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. ते स्वतःही वेळ मिळेल तेव्हा रोजगार हमीच्या कामावर व इतर ठिकाणी कामास जावू लागले. दुसऱ्या प्रयत्नात ते दहावी पास झाले. दरम्यान त्याच्याच शेतातील रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून काम चालू झाले. त्या कामावर ते स्वतः जाऊ लागले. शिकून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी असल्याने काम करताना ते सहकाऱ्यांना म्हणायचा, "या रस्त्याने माझी स्वतःची गाडी येणार आहे. तेव्हा काम नीट करा." पुढे कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेत असतानाच २००५ साली त्याची मुंबई पोलिसात शिपाई म्हणून भरती झाली. २००७ साली ते दहशतवादी विरोधी पथकात सामील झाले. पुढे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांनी चोख कामगिरी बजावली. यावेळी महाराष्ट्र पोलिसांचेही ''फोर्स वन कमांडो'' पथक असावे हा विचार पुढे आला आणि २००९ च्या पहिल्याच फोर्स वन कमांडोमध्ये त्यांची निवड झाली. २०१३ साली खात्यांतर्गत परीक्षेमधून त्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आणि आता नुकतीच त्यांना बढती मिळून नांदेड गुन्हे अन्वेषण विभागात पोलिस निरीक्षकपदी नेमणूक झाली आहे. साहजिकच रोजगार हमीच्या कामावर काम करणारे दहावी नापास बाळासाहेब पोलिस निरीक्षक बनून करकंब गावात आला तेव्हा त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.
कोणतेही यश संपादन करण्यासाठी गबिबी कधीही आडवी येत नाही, तर त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आणि चिकाटी असणे गरजेचे आहे. माझ्या यशामध्ये माझे आई-वडील, बंधू व मित्र परिवार यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्या ऋणात कायम राहून चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण करण्याचा मानस आहे.
- बाळासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक
Web Title: Employe Servent To Police Inspector Balasaheb Jadhav
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..