येवती येथील गड-किल्ले बांधणी स्पर्धेला मिळाला बालचमूंचा उत्साही प्रतिसाद 

Gad Kille
Gad Kille

पेनूर (सोलापूर) : किल्ले बनवण्याच्या आपल्या समृद्ध परंपरेचं जतन व्हावं आणि गड - किल्ल्यांचा आपला ऐतिहासिक ठेवा प्रत्येकाच्या मनामनांत रुजावा यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान, मोहोळ विभाग आणि सह्याद्री ज्योती रक्तदाता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येवती (ता. मोहोळ) येथे भव्य गड - किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले गेले. 

दिवाळी आली, की लहान मुलांना सुटीत गड - किल्ले बनवण्याची हौस असते. शहर असो किंवा खेडेगाव, सर्वत्रच बच्चेकंपनी गड - किल्ले बनवण्याचे प्रयत्न करतात. गड - किल्ले बनवण्यासाठी विटा, दगड, माती असे अनेक प्रकारचे साहित्य जमवून मुले किल्ला करतात. विटांवर विटा रचल्या जातात. गडाला मुख्य दरवाजा किंवा प्रवेशद्वार व त्याला असलेली सुंदर कमान बनविली जाते. गड - किल्ल्यांवर बुरुजांचे अस्तित्व दाखविले जाते. किल्ल्यांवर पहारा देणारे सैनिक मंडळी जागोजागी उभा केले जातात. मुख्य दरवाज्याजवळ किंवा बुरुजाशेजारी मोठ्या तोफा ठेवल्या जातात. गड - किल्ल्यांवर जाण्यासाठी पायऱ्याही दाखविल्या जातात. 

अशाच स्वरूपाचा प्रयत्न येवती येथील स्पर्धेत दिसून आला. हुबेहूब प्रतिकृती सादर करण्याचा प्रयत्न या वेळी स्पर्धाकांनी केला. यातून त्यांची विचार करण्याची दृष्टी दिसून येते, प्रतिभा दिसून येते. या स्पर्धेमुळे गावातील वातावरण शिवमय होऊन गेले. गड - किल्ल्यांविषयीचे प्रेम या माध्यमातून दिसून आले. 

या स्पर्धेत एकूण 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक आणि पदक देण्यात आले. तसेच या स्पर्धकांमधून तीन क्रमांकही काढण्यात आले. यात प्रथम - माऊली सुरेश खुर्द, द्वितीय - सत्यजित अतुल खुर्द व तृतीय क्रमांक अजय राजकुमार खुर्द याचा आला. 

स्पर्धेसाठी सौरभ खुर्द, सुशील खुर्द, नवनाथ शिंदे, विशाल खुर्द, नंदकुमार खुर्द यांनी परीक्षकाची भूमिका बजावली. स्पर्धकांनी कोरोनापासून बचावासाठी योग्य ती काळजी घेऊन किल्ले बांधणी स्पर्धेत सहभाग नोंदवला. कोरोनाच्या काळातील निराशेच्या वातावरणात ही किल्ले स्पर्धा एक वेगळं चैतन्यच घेऊन आली. 

सर्व तरुणांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये सामाजिक कार्याची ओढ निर्माण होईल असा उपक्रम राबविल्याबद्दल हेमंत गोडसे व आकाश गोडसे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com