
नववर्षातही शहराला चार-पाच दिवसांआडच पाणी! नियोजन जमलेच नाही; आता ‘अमृत’ची प्रतीक्षा
सोलापूर : नववर्षात जुळे सोलापुरातील नागरिकांना चार दिवसांऐवजी तीन दिवसांआड पाणी मिळेल, अशी वल्गना झाली. पण, तसे काहीच होणार नसून, शहरवासीयांना पूर्वीप्रमाणेच चार-पाच दिवसांआड पाणी मिळणार आहे.
शहरातील नागरिकांना सात-आठ वर्षांहून अधिक काळ लोटला, तरीदेखील नियमित पाणी मिळू शकलेले नाही. उजनी धरण, औज बंधारा, हिप्परगा तलाव शहराच्या उशाला असतानाही पाणीपुरवठा विस्कळितच आहे, हे विशेष. स्मार्ट सिटीतून समांतर जलवाहिनी मंजूर होऊन तीन-चार वर्षे होऊनही प्रत्यक्ष काम होऊ शकलेले नाही. तत्पूर्वी, शहरातील विविध नगरांमध्ये अंतर्गत पाइपलाइन टाकताना भविष्यातील लोकसंख्यावाढीचा अंदाज न घेताच कामे केली गेली. अधिकाऱ्यांच्या त्या नियोजनामुळे आता ‘अमृत’ योजनेशिवाय पर्यायच शिल्लक राहिलेला नाही. अमृत योजनेतून निधी मिळाल्यानंतर पाण्याच्या टाक्या, अंतर्गत पाइपलाइन टाकली जाणार आहे. त्यानंतर सार्वजनिक नळ व पाण्याची गळती बंद करून पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करण्याचे नियोजन आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी अनेकदा बैठका घेऊन नियोजन केले आणि कंबर तलाव ते सोरेगाव या परिसरातील लोकांचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार असे ठरले. पण, नवीन वर्ष सुरू झाले तरीदेखील प्रत्यक्षात तसे काहीच झालेले नाही.
नववर्षात पायाभूत सुविधांवर भर
नववर्षात काहीतरी आश्वासन देण्यापेक्षा आगामी काळात पाणी, ड्रेनेज, कचरा, दिवाबत्ती, रस्ते अशा मूलभूत सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न राहील. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ‘अमृत’ योजनेतून शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
- शीतल तेली-उगले, आयुक्त, सोलापूर महापालिका