esakal | शेजारच्या जिल्ह्यात पीकविमा मंजूर, मात्र मंगळवेढ्याला मिळतेय सापत्नपणाची वागणूक ! शेतकरी संतप्त 

बोलून बातमी शोधा

crop insurance

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात या हंगामातील पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे, त्यामुळे त्या भागातील नातेवाईक शेतकऱ्यांकडून या भागातील शेतकऱ्यांना "आमचा विमा मिळाला आहे, तुमचा मिळाला का?' अशी विचारणा केली जात आहे. 

शेजारच्या जिल्ह्यात पीकविमा मंजूर, मात्र मंगळवेढ्याला मिळतेय सापत्नपणाची वागणूक ! शेतकरी संतप्त 
sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेच्या सन 2019-20 च्या हंगामातील आंबा बहारमधील 3722 शेतकऱ्यांचा पीक विमा कधी मंजूर होणार? याकडे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, विमा कंपनीने शेजारच्या जिल्ह्यात विमा मंजूर केल्यामुळे मंगळवेढा तालुक्‍याला सापत्नपणाची वागणूक देणारी विमा कंपनी तालुक्‍यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना कधी न्याय देणार, असा सवाल विचारला जात आहे. 

गतवर्षीच्या 2019-20 हंगामामध्ये मृग बहारमधील शेतकऱ्यांना पीक विमा देताना मरवडे, भोसे आणि मंगळवेढा या महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पर्जन्यमापक व महावेधच्या अहवालाचा आधार घेत वगळले. त्यानंतर आंबा बहारमध्ये विमा भरलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले. त्यामध्ये तालुक्‍यातील सात मंडलांमधील आंधळगाव 175, भोसे 456, बोराळे 106, हुलजंती 2162, मंगळवेढा 250, मारापूर 185, मरवडे 388 अशा एकूण 3 हजार 722 शेतकऱ्यांनी विमा भरला. यामध्ये विमा हप्त्यापोटी 2 कोटी 69 हजार 219 रुपये विमा कंपनीला दिले. 

ग्रीन इन्शुरन्स कंपनीने या हंगामातील नुकसान झालेल्या फळपिकांची भरपाई अद्याप शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली नाही. तर ऑक्‍टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे तालुक्‍यातील फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना आधार देण्याच्या दृष्टीने मागील वर्षीची विमा रक्कम तातडीने बॅंक खात्यावर जमा करण्याची आवश्‍यकता आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात या हंगामातील पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे, त्यामुळे त्या भागातील नातेवाईक शेतकऱ्यांकडून या भागातील शेतकऱ्यांना "आमचा विमा मिळाला आहे, तुमचा मिळाला का?' अशी विचारणा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे विमा कंपनीच्या हालचालीकडे लक्ष लागले आहे. 

तालुक्‍यातील शेतकऱ्याला खरीप, रब्बी व फळ पिकांचा विमा मिळावा म्हणून दिवंगत आमदार भारत भालके सातत्याने विमा कंपनीला तगादा लावत होते. प्रसंगी विधानसभेत विमा कंपनीच्या निष्काळजीपणाबद्दल देखील धारेवर धरण्याचे काम केले. पण दुर्दैवाने त्यांच्या अकाली निधनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आता कोण लक्ष देणार, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान, तालुक्‍यातील शेतकऱ्यांना फळपीक विमा मंजूर असल्याची यादी सोशल मीडियातून फिरत आहे. मात्र याबाबत देखील विमा कंपनीने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. 

अवकाळी पावसाने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. परंतु विमा कंपनी भरपाई देताना मात्र ताटकळत ठेवल्यामुळे फळपिकांची पुढील जोपासना करणे मुश्‍किलीचे ठरत आहे. त्यामुळे 2019-20 मधील आंबा बहारचा विमा तत्काळ बॅंक खात्यावर जमा करावा. 
- अश्‍पाक पाटील, 
शेतकरी, बावची 

संपादन : श्रीनिवास दुध्याल