
खरीप पेरणीची मिटली चिंता! ओलावा कमी झाल्यावरच शेतकऱ्यांनी करावी पेरणी
सोलापूर : मायनस १३ टक्क्यांकडे वाटचाल करणारे धरण आता मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे प्लसकडे वाटचाल करू लागले आहे. दोन दिवसांत धरणात जवळपास सव्वा टीएमसी पाणी आले आहे. ८ जुलैला मायनस १२.७७ टक्के पाणीसाठा होता, आता धरण मायनस १०.५२ टक्क्यांवर आले आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा वाढला असून ओल कमी झाल्यावरच शेतकऱ्यांनी बियाणांची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील रब्बी पिकांची विशेषत: उसाचे क्षेत्र वाढण्यास आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात उजनी धरणाचाच सर्वाधिक वाटा राहिला आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठा मायनस १२.७७ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. पण, ८ जुलैला दुपारी दोन वाजता सुरु झालेला पाऊस ९ जुलैच्या रात्री उशिरापर्यंत सुरुच होता. धरणात दौण्डवरून २० हजार क्युसेक वेगाने पाणी धरणात येत होते. १२ तासांत ०.८४ टीएमसी पाणी धरणात जमा झाले आहे. धरण परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने धरणात पाणी येत आहे. समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील खरीपाची पेरणीही वेगात सुरु आहे. आतापर्यंत तीन लाख ७२ हजार हेक्टरपैकी (उसासह) एक लाख ६३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीन, भुईमूग, उडीद, बाजरी, मका, तूर या खरीप पिकांचा समावेश आहे. आता दोन दिवसांपासून पाऊस असल्याने वाफसा आल्यानंतर उर्वरित क्षेत्रावरील पेरणी होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
६० हजार मे.टन खताचा साठा
युरिया २३ हजार ८८३ टन, डीएपी पाच हजार १४२ टन एनपीकेएस १६ हजार ७१९ टन, एमओपी साडेतीन हजार टन आणि एसएसपी साडेअकरा टनापर्यंत खताचा जिल्ह्यात सध्या साठा आहे. शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात रासायनिक खताचा वापर करू नये. जेणेकरून जमिनीची उत्पादकता कमी होऊन पुढे ती नापिक होऊ शकते, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.
ओल कमी झाल्यावरच करावी पेरणी
दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. पेरणीसाठी व पेरणी झालेल्या पिकांसाठी हा पाऊस पोषक आहे. पण, आता शेतकऱ्यांनी जमिनीला वापसा आल्यानंतरच पेरणी करावी. शेतात साचलेले पाणी बाहेर काढून द्यावे, जेणेकरून त्याठिकाणी पाणथळ तयार होणार नाही.
- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
Web Title: Farmers Should Kharif Sowing Only When The Moisture Is
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..