जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर हरेश सुळची उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी

हरेश सुळ याची प्रेरणादायी यशोगाथा
Haresh Sul
Haresh Sul

उपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) - सतत अपयश येऊन देखील हार न मानता, अभ्यासात सातत्य ठेवत जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास जोरावर पाचव्या प्रयत्नात एमपीएससीतुन उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातलेले मोरोची (ता. माळशिरस) येथील शेतकरीपुत्र हरेश मोहन सुळ. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

उपजिल्हाधिकारी हरेश सुळ सांगतात की, घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. वडिल शिक्षक तर आई गृहिणी होती. वडिल सध्या सेवानिवृत्त आहेत. गावातील सुशिक्षित नागरिक म्हणून वडिलांकडे गावकरी पाहायचे. त्यामुळे कुणाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी वडिलांकडे येत असत. वडिलांनाही सामाजिक कार्याची प्रचंड आवड. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर शेती करत समाजकार्यासाठी त्यांनी वाहुन घेतले होते. वडिलांच्या या कार्याची छाप माझ्यावर पडली होती. त्यात घरात शैक्षणिक वातावरण असल्याने, माझ्या प्राथमिक शिक्षणाचा पाया घरातूनच भक्कम झाला. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच शाळेत झाले. पहिलीपासून वर्गात हुशार विद्यार्थी होतो. पण अधिकारी व्हावे असे शिक्षण पूर्ण होईपर्यंत काही निश्चित नव्हते.

दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर वडिलांच्या एका मित्रांनी आय आय टी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पुण्यात क्लासला प्रवेश घेतला. दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले त्यात ग्रामीण भागातुन आल्याने, शहरी भागात रूळण्यासाठी बराच कालावधी लागला. आय आय टि मध्ये काही जम बसेना म्हणून पुण्यातुनच इंजिनिअरिंगच्या दृष्टीने अकरावी बारावी केली. डि वाय पाटील महाविद्यालयातुन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण केले. त्यामुळे महाविद्यालयाच्या कॅम्पसमधून एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली.

आयुष्यात आणखी काय हवे असते चांगले शिक्षण व नंतर चांगली नोकरी हे सर्वस्व मिळाले होते. परंतु दैनंदिन तेच काम कंपनीत असल्याने, व स्वतःच्या कलेला वाव मिळत नसल्याने, नोकरी सोडून स्वतः चा व्यवसाय सुरू करावा अशी मनोमन इच्छा निर्माण होऊ लागली. नोकरीत मन ही रमेना. त्यामुळे जीवाची घालमेल आई-वडिलांना सांगितली व नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली. माझ्या संपूर्ण जडणघडणीत आईवडिलांची मोलाची भुमिका होती. त्यांचा माझ्यावर पुर्णपणे विश्वास होता. या निर्णयाला त्यांनी कसलाही विचार न करता पाठींबा दिला. नोकरीचा राजीनामा दिला. परंतु व्यवसाय करायचा तरी नेमका काय? असा मोठा प्रश्न होता. त्यात अनेकांचे बोलणे सुरू झाले, चांगली नोकरी सोडून काय करत बसलाय. प्रेरणा देण्याचे सोडून अनेकांनी खच्चीकरण होईल असेच बोल वाटु लागले. परंतु माझा स्वतःचा विचारावर ताकदीवर विश्वास होता.

एका मित्रांच्या वडिलांकडे व्यवसाय करण्यासंदर्भात मार्गदर्शनासाठी गेलो असता. त्यांनी स्पर्धा परीक्षा करा असा सल्ला दिला. पै-पाहुण्यातुन जवळपास कुणीही प्रशासनात साधे तलाठी देखील नव्हते. त्यामुळे याबाबत मार्गदर्शन करणारे कुणीही नव्हते. परंतु आता स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे इथुनच व्यवसाय करण्याच्या निर्णयाला छेद दिला. पुन्हा आईवडिलांना कळविले. सातत्याने निर्णय बदलल्याने कसे व्हायचे असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. परंतु 'आता निर्णय घेतलाच आहे तर माघार घेऊ नको', तु यशस्वी होशील असा आत्मविश्वास वाढवणारा पाठींबा दिला. जिद्द व चिकाटीने अभ्यास सुरू केला.

प्रथम युपीएससी करण्याचा निर्धार केला. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही परिक्षेत कधीही अनुत्तीर्ण झालेलो नव्हतो. त्यामुळे अपयश काय असतं हे माहीत नसल्याने, सहजासहजी यश संपादन होईल अशा भ्रमात असताना, पहिल्या घासाला खडा लागावा तसा आयुष्याच्या करिअरमध्ये व स्पर्धा परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात अपयशास सामोरे जावे लागले. थोडेसे खच्चीकरण झाले परंतु नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न केले परत अपयश आले. त्यामुळे मित्रांच्या मार्गदर्शनामुळे स्टाफ सिलेक्शनसाठी प्रयत्न सुरू केले. उद्देश हा होता की, हातात एखादी तरी प्रशासकीय नोकरी असावी. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्यातही दोन वर्ष सतत अपयश येत गेले. आता मात्र पुर्ण हैराण झालो होतो. दोन ते तीन वर्ष गेल्यानंतर युपीएससी सोडून एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला. परंतु अपयश काही पाठ सोडायला तयार नव्हते अन् मी काही प्रयत्न करायचे सोडत नव्हतो.

एक एक वर्ष निघून चालली होती. त्यामुळे आता कुणी विचारले काय करतो तर सरळ शेती करतोय म्हणून सांगायचो. स्पर्धा परीक्षेच्या काळात या गोष्टी सर्वांनाच सहन कराव्या लागतात. तशा माझ्याही नशीबी आल्या होत्या. या सर्व गोष्टींना एकच उत्तर होते ते म्हणजे प्रशासकीय अधिकारी पदावर विराजमान होणे. एमपीएससीतुन सलग दोन वर्ष अपयश आल्यानंतर पै पाहुण्यांचे कार्यक्रम सण उत्सव सर्वकाही बंद केले. पुर्णवेळ स्पर्धा परीक्षेसाठी वाहुन घेतले. मुख्य परिक्षेपर्यंत जायचो परंतु मुलाखतीसाठी निवड होत नसायची. पाठिमागील चुकांची दुरुस्ती करत नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न करायचो. परंतु यशाचा थांगपत्ता नव्हता. त्यामुळे आता हे देखील क्षेत्र सोडून शेती व राजकारण करावे असे मनोमन विचार येऊ लागले होते. परंतु एवढे प्रयत्न केलेच आहेत तर आणखी थोडा धीर धरू म्हणत प्रयत्न सुरू होते. 2019 ची परिक्षा पाचवा प्रयत्न होता. अनेक परिक्षांचा अनुभव पाठीशी होता.

अभ्यास चांगला झाला होता. पुर्व, मुख्य परीक्षा, मुलाखत सर्व झाले. आत्मविश्वास इतका होता की, यंदा एकतर पद मिळुन जाईल हे नक्की होतं. यावेळी गुलाल घेउनच घरी जायचे असे ठरवले होते. निकाल लागेल वाटेल असं वाटत असतानाच लॉकडाऊन जाहीर झाले अन् निकाल पुढे ढकलला. त्यामुळे गावाकडे आलो‌. दैनंदिन शेती कामात वडिलांना मदत करत होतो. अशातच निकाल लागला अन् उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. हि बातमी वडिलांना सांगितली. त्यांनी तिथेच जल्लोष साजरा केला. त्यांच्या डोळ्यातुन आनंदअश्रू वाहु लागले. मित्रांनी गावात जल्लोषात मिरवणुक काढली ज्याची मी सहा वर्षे वाट बघत होतो. स्पर्धा परीक्षेच्या या कठिण काळात आई वडिलांनी कायम धीर देण्याचे काम केले. त्यांच्यामुळेच इथपर्यंत पोहोचू शकलो.सध्या पुणे येथे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com