शेतकऱ्याच्या मुलाचे 'MBBS' करून 'UPSC'त यश

शेतकऱ्याच्या मुलाने आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडत एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात आयआरटीएस (IRTS-Indian Railway Traffic Service) पदाला गवसणी घातली.
Dr. Ramdas Bhise
Dr. Ramdas BhiseSakal
Summary

शेतकऱ्याच्या मुलाने आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडत एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात आयआरटीएस (IRTS-Indian Railway Traffic Service) पदाला गवसणी घातली.

जिद्द चिकाटी व आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर अभ्यास करून शेतकऱ्याच्या मुलाने आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडत एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात आयआरटीएस (IRTS-Indian Railway Traffic Service) पदाला गवसणी घातली आहे. फोंडशिरस (ता.माळशिरस) येथील डॉ. रामदास वामन भिसे असे त्यांचे नाव असुन, त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

डॉ. रामदास भिसे सांगतात की, फोंडशिरस गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वस्ती होती. शेतकरी कुटुंब, आई वडील दोघेही निरक्षर. चार ते पाच एकर शेती व त्याला जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू होता. आई वडील रात्र-दिवस शेतात कष्ट करत असायचे. जणु त्यांचा जन्मच कष्ट करण्यासाठी झालाय असा त्यांचा दिनक्रम असायचा. आपण अडाणी असलो तरी, मुलांनी तरी चांगले शिक्षण घ्यावे. यासाठी त्यांची नेहमीच धडपड असायची. त्यासाठी शाळेतून आलो की, अभ्यास करण्यासाठी त्यांची सक्त ताकीद असायची. घराजवळील कोडलकर वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. पटसंख्या अवघी बारा, त्यामध्ये वर्गात पहिला नंबर माझा असायचा. त्यामुळे आई-वडिलांना आनंद वाटत असायाचा.

परंतु पाचवी ते दहावी शिक्षण घेण्यासाठी गावातील बाणलिंग विद्यालय फोंडशिरास या शाळेत प्रवेश घेतला. इथे मात्र पटसंख्या भरपूर व स्पर्धा देखील भरपूर असल्याने, इथे पहिला नंबर आणुन दाखव असे अनेकजण बोलायचे. अभ्यासात सातत्य ठेवले व चांगल्या मित्रांचा सहवास लाभला त्यामुळे गुणवत्तेत आणखी भर पडली. त्याचबरोबर राजेंद्र करमाळाकर सर यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रेरणादायी यशोगाथा सांगत शिक्षणाचे खरे महत्व आणखी पटवून दिले. ते अधुनमधून स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती देत असत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे येण्याची प्रेरणा त्यावेळी मिळाली. स्वतःला सिद्ध करण्यासाठी चांगल्या रितीने अभ्यास करत, दहावीच्या बोर्ड परीक्षेत वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो आणि आमच्या शाळेचे टक्केवारीचे तेव्हापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक केले. त्यामुळे माझ्या आशाआकांक्षा आणखी वाढल्या.

अकरावी बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्यासाठी अनेक मित्रांनी फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे शेती महाविद्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी देखील त्यासाठी प्रयत्नशील होतो. परंतु तेथील खर्च पेलायचा नाही. तु आपले सदशिवनगर किंवा नातेपुते मधुन शिक्षण पुर्ण कर असा आई व मोठ्या भावाकडून सांगण्यात आले. परंतु हट्ट धरून बसल्याने तेथील प्रवेश घेण्यासाठी वडिलांकडून परवानगी मिळाली. स्पर्धा परीक्षा करायची हे स्वप्न उराशी बाळगून होतो. परंतु स्पर्धा परीक्षेत लवकर यश मिळाले नाही अथवा यशच मिळाले नाही तर काय करायचे असा मोठा प्रश्न डोळ्यासमोर होता. त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे रहाता येईल असे काहीतरी शिक्षण घ्यावे असा निश्चय केला. त्यात आठवीत असताना वडिलांना परालिसिसचाअटॅक आला होता. त्यांचे उपचार सोलापूर येथील डॉ शिरीष वळसंगकर यांच्याकडे केले होते. त्यामुळे वडिलांची इच्छा होती की, आयुष्यात मी डॉ वळसंगकर यांच्यासारखा एक स्पेशालिस्ट डॉक्टर व्हावे. त्यामुळे डॉ वळसंगकर यांची प्रेरणा घेऊन 'प्लॅन बी' म्हणून मेडिकल करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने बारावीसाठी विषय निवडून अभ्यास सुरू केला.

मेडिकलसाठी असणारी एंट्रेस परिक्षा (Entrance Exam) दिली. पहिल्याच प्रयत्नात बीएएमएससाठी (BAMS) निवड झाली व अगदी थोडक्या गुणांनी एमबीबीएस ची संधी हुकली. अनेकांनी बीएएमएससाठी प्रवेश घेण्याचे सुचवले. परंतु पहिल्या प्रयत्नात आपण इथपर्यंत आलो, आणखी प्रयत्न करू यासाठी आईवडिलांना कल्पना दिली व प्रयत्न सुरू ठेवले. दुसऱ्या प्रयत्नात एमबीबीएससाठी निवड झाली. शेठ जी एस मेडिकल कॉलेज अँड केईम हॉस्पिटल मुंबई येथे प्रवेश घेतला. चांगल्या गुणांनी ती पदवी संपादन केली. एकिकडे वडिलांच्या स्वप्नपूर्तीकडे तर दुसरीकडे 'प्लँन बी' नुसार स्वतः च्या पायावर उभे राहात स्पर्धा परीक्षा देण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद होत होता. इथपर्यंतच्या प्रवासात अनेकवेळा पैश्यांची आर्थिक मोठी चणचण भासत असायची. परंतु वडिलांची माझ्या शिक्षणासाठी काहीही करण्याची तयारी होती फक्त अपेक्षित यश मिळाले पाहिजे असा त्यांचा आग्रह असायाचा. याकाळात दुग्ध व्यवसायाने वडिलांना मोठी साथ दिली.

मुंबईतील पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, व हातात एक चांगली पदवी असल्याने, स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व दिल्ली गाठली. पहिल्या प्रयत्नात अपयशास सामोरे जावे लागले. परंतु स्वतः वर चांगला विश्वास असल्याने, खच्चीकरण होऊ दिले नाही. जिद्द व चिकाटीने परत अभ्यास करत युपीएससीची परिक्षा दिली. अन् या दुसऱ्या प्रयत्नात युपीएससीतुन आयआरटीएस (IRTS) म्हणून निवड झाली. देशातील विविध शहारात सेवा केल्यानंतर ऐन कोरोना काळात त्यांची सोलापूर येथे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक, रेल्वे विभाग सोलापूर येथे नियुक्ती झाली. याकाळात किसान रेल्वे सुरू करून यशस्वीपणे चालवण्यामध्ये विशेष योगदान दिले, याचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. नुकतीच त्यांची पुणे येथे मंडल वाणिज्य प्रबंधक म्हणून पदोन्नती झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com