
सोलापूरः तो स्वतः परीक्षेत अपयशी ठरला. पण माझे अपयश हे इतरांसाठी यशाचा राजमार्ग ठरू शकते, हे लक्षात घेऊन त्या तरुणाने शहरातील काही तरुणांना एकत्रित करत यशाचा मार्ग दाखवला. अगदी मैदानावरील मोकळ्या जागेत तरुणांना एकत्र करून परीक्षेतील यशासाठी विनाशुल्क मार्गदर्शन केले. इतकेच नव्हे तर तब्बल तीस मराठी मुलांना रेल्वे भरतीत यशस्वी करून दाखवले. यासोबत एसटी, कोर्ट, पोलिस भरतीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक तरुण यशस्वी झाले आहेत. रेल्वेमध्ये मराठी मुलांचा टक्का वाढावा, याबाबत चर्चा होत असताना या तरुणाने प्रत्यक्ष रेल्वे परीक्षा पॅटर्न स्थानिक मुलांना समजून सांगत ही कामगिरी केली आहे.
सोलापूर शहरातील गणेश बाबुराव माने हा तरुण पदवी शिक्षणानंतर बीएड करत अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. शिक्षक होण्याची संधी हुकल्यानंतर त्यांनी रेल्वे भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी जोरदार तयारी केली. रेल्वे परीक्षेतील सामान्य ज्ञान व गणित या विषयाची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला. मात्र त्यानंतर शारीरिक क्षमतेमध्ये तो कमी पडला. दुसऱ्यांदा परीक्षा दिल्यानंतर तो पुन्हा यशस्वी झाला अन् मुलाखतीच्यावेळी आजारी पडला. दोनदा दुर्दैव त्यांच्या आड आले. निराशेशिवाय त्याच्या समोर काहीही राहिले नव्हते.
पण काही दिवसात आपण लेखी परीक्षेत यशस्वी झालो व केवळ तांत्रिक बाबीत कमी पडलो. म्हणजे इतरांना रेल्वे भरतीची संधी मिळवून देऊ शकतो, हे त्याच्या लक्षात आले. जवळ काही मार्गदर्शनासाठी कोणतेही भांडवल अथवा जागा नव्हती. तेव्हा त्यांनी शहरातील किल्ला बागेत खंदकाजवळ परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या तरुणांची जमवाजमव केली. त्यांना रेल्वे परीक्षेबद्दलची माहिती व यश मिळवण्याबाबत मार्गदर्शन सुरू केले. इकडे तिकडे करिअरच्या शोधात फिरणारी मुले त्याच्याकडे आकर्षित झाली. दररोज मोकळ्या जागेत रेल्वे भरती परीक्षेचा पॅटर्न, बारकावे, विषयांचा अभ्यास, ग्रुप डिस्कशन आदीमधून अनेक तरुण परीक्षेसाठी तयार झाले. पहिल्याच वर्षात खंदकबाग मैदानावर शिकणारे 15 तरुण रेल्वे भरतीत यशस्वी झाले. दुसऱ्या वर्षी पुन्हा 15 जणांनी रेल्वेची नोकरी मिळवली. मग कोर्ट परीक्षांचा अभ्यास गणेश माने यांनी सुरू केला. त्याचा पॅटर्न समजावून घेत त्यासाठी देखील मार्गदर्शन सुरू केले. या परीक्षेसाठी तयारी करणारे दहा तरुण कोर्ट परिक्षेत यशस्वी होऊन रुजू झाले. एसटी भरतीच्या बाबतीत देखील केलेल्या मार्गदर्शनामुळे 12 जण एसटीमध्ये भरती झाले.रेल्वे भरती प्रक्रियेचा दोन ते तीन वर्षाचा कालावधी कमी करावा यासाठी गणेश माने यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. आताही कोरोना संकटात सळई हनुमान मंदिर परिसरात गणेश माने हे आजही तरुणांना मार्गदर्शन करत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.