esakal | सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच सोलापूर-पुणे "मेमू' धावणार ! कधीपासून? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Memu Train

पुणे व सोलापूरकरांचा प्रवास सुखकर व जलद व्हावा यासाठी सोलापूर-पुणे मेमू गाडी धावणार असून, तसे प्रयत्न देखील करण्यात येत आहेत. मागील अनेक वर्षांपासून सोलापूरकरांच्या मागणीला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच सोलापूर-पुणे "मेमू' धावणार ! कधीपासून? वाचा सविस्तर

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : पुणे व सोलापूरकरांचा प्रवास सुखकर व जलद व्हावा यासाठी सोलापूर-पुणे मेमू गाडी धावणार असून, तसे प्रयत्न देखील करण्यात येत आहेत. मागील अनेक वर्षांपासून सोलापूरकरांच्या मागणीला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

सोलापूर रेल्वे प्रशासानाकडून सोलापूर विभागातील विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतर सोलापूर-पुणे मेमू पहिली गाडी धावण्यास ग्रीन सिग्नल दिला जाण्याची शक्‍यता अधिकृत सूत्रांनी दिली. 

मेमू म्हणजे "मेन लाइन इलेक्‍ट्रिक मल्टिपल युनिट'. या रेल्वेस जूननंतर ग्रीन सिग्नल मिळण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोरोना महामारीमुळे विभागातील सर्व पॅसेंजर गाड्या बंद असल्याने जूनपर्यंत सोलापूरकरांना मेमूची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. 

सोलापूर विभागात दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. येत्या काही महिन्यांतच विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच सोलापूर-पुणे मेमू सुरू करण्यास रेल्वेकडून हिरवा कंदील मिळणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

सोलापूर विभागातून डेमू गाड्या सुरू आहेत. सोलापूर विभागात विद्युतीकरणाचे काम पूर्ण नसल्याने व कोरोना महामारीमुळे विभागातील डेमू गाड्या बंद आहेत. डेमू गाड्या या डिझेलवर धावत असल्याने प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून मेमू सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आता या मागणीची पूर्तता लवकरच होणार आहे. 

"मेमू'चा फायदा 

 • सोलापूर-पुणे प्रवास जलद होणार 
 • प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळतील 
 • वेळेची बचत होईल 
 • डिझेलचा वापर बंद होईल 
 • डिझेलचा वापर बंद झाल्याने पर्यावरणाची हानी टळेल 

या असणार अत्याधुनिक सुविधा 

 • मेमूतील ब्रेकिंग सिस्टीम अत्याधुनिक पद्धतीची असणार 
 • प्रवाशांसाठी आरामदायी आसन व्यवस्था असेल 
 • पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम राहील; जेणेकरून पुढील रेल्वे स्थानकाची माहिती प्रवाशांना मिळणार 
 • एलईडी लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी इंडिकेशन 
 • विजेची बचत होईल 
 • ताशी 110 ते 130 किलोमीटर वेग असेल 

या मेमू गाड्या आहेत प्रस्तावित 

 • दौंड-मनमाड 
 • सोलापूर-दौंड 
 • दौंड-वाडी 

मागील चार-पाच वर्षांपासून रेल्वे प्रशासनाकडे मेमू सेवा सुरू करण्यासाठी अनेकदा मागणी केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून जूननंतर मेमू सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याने सोलापूरकरांचा प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे. 
- संजय पाटील, 
रेल्वे प्रवासी वाहतूक संघटना, सोलापूर 

सोलापूर विभागात विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत काम पूर्ण होईल. विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच मध्य रेल्वेकडून मेमूचे रेक घेतले जातील व त्यानंतर प्रथम सोलापूर-पुणे मेमू धावण्यास सुरवात होईल. 
- प्रवींद्र वंजारी, 
वरिष्ठ विभागीय मुख्य परिचालन व्यवस्थापक, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image