कॉंग्रेस शहराध्यक्षपदासाठी पाचजण इच्छूक ! इच्छुकांची महापालिका निवडणुकीपूर्वी फिल्डिंग

sushil-praniti shinde
sushil-praniti shinde

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची पदे मिळविण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. साडेतीन वर्षाची लक्षणीय कारकिर्द पूर्ण करणारे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांना आता पक्षाअंतर्गत विरोध वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, संजय हेमगड्डी, चेतन नरोटे, राजन कामत, अरुण शर्मा यांची नावे आता शहराध्यक्षपदासाठी चर्चेत आली आहेत.

... तर कॉंग्रेस भवनसमोर ठिय्या आंदोलन
पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निवडणूक प्रचारानिमित्त मंत्रिमंडळातील दिग्गज नेतेमंडळी सोलापूर दौऱ्यावर आले. तेव्हा कार्यक्रमाच्या बॅनरवर कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते सुशीलकुमार शिंदे यांचे छायाचित्र नसल्याने युवक कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस, विद्यार्थी कॉंग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यावेळी आपल्या राष्ट्रीय नेत्यांचा अपमान झाल्यानंतरही शहराध्यक्ष प्रकाश वाले या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी शहरातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले नाही. लोकसभा निवडणुकीत शहराध्यक्षांच्या वॉर्डात (बुथ) कॉंग्रेस उमेदवाराच्या तुलनेत भाजप उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली आहेत. आमदार प्रणिती शिंदे या कोरोनातून बाहेर आल्यानंतर त्यांचे स्वागत झाले नाही. मात्र वाले यांनी कोरोनावर मात केल्यानंतर जंगी स्वागत झाले. या सर्व गोंष्टींच्या पार्श्‍वभूमीवर वाले यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा दोन-तीन दिवसांत कॉंग्रेस भवनसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांनी दिला आहे.


भाजप-शिवसेनेचे युती सरकार असताना शहरात विविध मुद्यांवर सर्वाधिक आंदोलने झाली. शहरातील कॉंग्रेसचे काम पाहून प्रदेशाध्यक्षांनी विद्यमान शहराध्यक्षांची पाठ थापटल्याचा दावा वाले समर्थकांनी केला आहे. दरम्यान, स्व. धर्मा भोसले यांनी तब्बल 11 वर्षे शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. तर माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी नऊ वर्षे, सुधीर खरटमल यांनी साडेतीन वर्षे आणि माजी महापौर ऍड. यु. एन. बेरिया यांनी अडीच वर्षे शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले. वाले यांना आता साडेतीन वर्षे पूर्ण झाली असून आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी नवा शहराध्यक्ष मिळावा, अशी मागणी आता पक्षातून होऊ लागली आहे. मात्र, वाले यांच्या कार्यकाळात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मतदारसंघातून अनेक दिग्गजांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे या सुमारे 15 हजार मताधिक्‍यांनी विजयी झाल्या. तर बाबा मिस्त्री यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात सुमारे 57 हजार मते घेतली. तत्पूर्वी, माजी आमदार दिलीप माने यांना सुमारे 42 हजार मते मिळाली होती. दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच ऍड. यु. एन. बेरिया यांनी शहर मध्यमधून मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी करीत पक्षातील नेत्यांबद्दल नाराजी व्यक्‍त केली. मात्र, त्यांना शांत करण्यातही वाले यांचा मोठा वाटा असल्याची चर्चा आहे. तरीही काही इच्छूकांनी जाणिवपूर्वक वालेंविरुध्द पक्षाअंतर्गत आवाज उठविण्यासंदर्भात पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाले यांच्याबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे या काय भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com