
सोलापूर : एक एकरात पाच लाखांचे उत्पन्न
सोलापूर - अंजनगाव खेलोबा येथील शेतकरी प्रमोद इंगळे यांनी गो-आधारित शेती करत असताना केवळ एकाच एकरात गो-खताच्या मदतीने पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. प्रमोद इंगळे यांची १४ एकर शेती आहे. त्यांच्या वडिलांपासून गोपालनाची परंपरा पूर्वीपासून आहे. त्यांनी ही परंपरा वाढवल्यानंतर त्यांच्याकडे सात गायी झाल्या. या सर्व गायी खिलार आहेत. गाईचे शेण व गोमूत्रापासून नैसर्गिक खते तयार करण्याचे ज्ञान त्यांनी मिळवले. घनजीवामृत, जीवामृत ही खते गायीच्या शेणापासून कशी करावीत, हे त्यांनी शिकून घेतले. याशिवाय ब्रह्मास्त्र, अग्नी अस्त्र, दशपर्णी अर्क, निरगुडी अर्क यांसारखे अनेक खतांचे प्रकार तयार करण्यामध्ये ते माहीर झाले.
त्यांनी काही वर्षांपासून रासायनिक शेती बंद करू गो-आधारित शेतीला सुरवात केली. हळूहळू रासायनिक खते वापरणे बंद केले. तसेच गो-आधारित खतांचा वापर सुरू केला. त्यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवला. अगदी मे महिन्यात देखील त्यांच्या शेतात गांडुळाच्या हालचाली पाहता येतात. त्यांनी यावर्षी एक एकरावर द्राक्षाची लागवड केली. या बागेला त्यांनी रासायनिक खतांची मात्रा दिली नाही. शेणखत व इतर उत्पादनांच्या खतांचा वापर सुरू केला. त्यांनी द्राक्षासोबत बेदाणा देखील तयार केला. नैसर्गिक व गो-आधारित खतांमुळे द्राक्षाची चव व गुणवत्ता ग्राहकांच्या पसंतीस उतरली.
ज्यांनी त्यांच्या द्राक्ष व बेदाण्याची चव अनुभवले ते त्यांचे कायमचे ग्राहक झाले. हे ग्राहक त्यांच्याकडे आजही मागणी नोंदवून द्राक्ष व बेदाणे घेतात. त्यांच्या द्राक्षाला ८० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. पण त्यांनी बेदाणा करण्याचे देखील ठरवले. दर महिन्याला १०० ते १५० किलो बेदाणा त्यांनी मागणीनुसार विकला. त्याला आजही ३०० रुपये भाव मिळतो आहे. इतर उत्पादकांच्या तुलनेत त्यांना जादा भाव मिळाला. रासायनिक खतांचा खर्च वाचला. त्यांनी फक्त ८१ हजार रुपयांचा खर्च लागवडीवर केला. त्यांना निव्वळ उत्पन्न पाच लाख रुपये मिळाले.
ठळक बाबी
- प्रमोद इंगळे यांच्याकडे आहेत सात गायी
- एक द्राक्ष शेतीचा लागवड खर्च ८१ हजार रुपये
- शेण व गोमूत्रापासून केलेल्या खतांचा वापर
- रासायनिक खतांचा वापर नाही
- द्राक्षाची विक्री ८० रुपये किलो तर बेदाण्याची विक्री ३०० रुपयाने
- एका एकरात पाच लाखांचे उत्पन्न
निसर्ग शेतीचे प्रशिक्षण तज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्याकडून घेतल्यानंतर गायींच्या मदतीने शेती सेंद्रिय केली. त्यामुळे रासायनिक खतांचा खर्च वाचला. पिकवलेल्या द्राक्षाची गुणवत्ता देखील चांगली असल्याने भाव मिळाला.
- नरेंद्र इंगळे, अंजनगाव खेलोबा, ता. माढा.
Web Title: Five Lakh Of Income In One Acre Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..