पंढरपूरला पुराचा धोका! उजनीतून भीमा नदीत सोडले ९० हजार क्युसेकने पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंढरपूर - उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी sangrhit photo
पंढरपूरला पुराचा धोका! उजनीतून भीमा नदीत सोडले ९० हजार क्युसेकने पाणी

पंढरपूरला पुराचा धोका! उजनीतून भीमा नदीत सोडले ९० हजार क्युसेकने पाणी

सोलापूर : पुण्यातील खडकवासला धरण हाऊसफुल्ल झाल्याने उजनीत येणारा विसर्ग वाढला आहे. उद्या (शनिवारी) एक लाख १३ हजार क्युसेकचा विसर्ग उजनीत येईल, असा अंदाज आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत ९० हजार क्युसेकने पाणी सोडले आहे. दुसरीकडे वीर धरणातून देखील ४० हजाराचा विसर्ग निरा नदीत सोडल्याने शनिवारी पंढरपूर परिसरातील चंद्रभागा काठावरील झोपडपट्टीत पाणी शिरेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. १६) दौंडवरून उजनीत येणारा विसर्ग ५५ हजारांपर्यंत होता. रात्री उशिरापर्यंत त्यात मोठी वाढ होईल, अशी स्थिती असल्याने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून उजनीतून ९० हजारांचा विसर्ग भीमेत सोडला होता. हे पाणी पंढरपूरजवळ पोहचायला साधारणत: १८ ते २० तास तर वीर धरणातील पाणी नरसिंगपूर (संगमाजवळ) येथे पोहचण्यासाठी ३५ ते ४० तास लागतात. ‘वीर’मधील पाणी नरसिंगपूरला पोहचण्यापूर्वी उजनीतील विसर्ग कमी करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून पंढरपूर शहराला पुराचा धोका निर्माण होणार नाही. दोन्ही नद्याच्या संगमाजवळील नदी पात्रातून साधारणत: एक लाख २० हजार क्युसेकपर्यंत पाणी मावते. तरीपण, वीर व उजनीतून सोडलेल्या विसर्गामुळे उद्या (शनिवारी) पंढरपूरजवळील नदी पात्रात सुमारे एक लाख २५ हजार क्युसेकचा विसर्ग राहणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरालगत पुरस्थिती असेल, असा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठावरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उजनीतील पूरसाठा नियंत्रित

पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे १०० टक्के भरली आहेत. दुसरीकडे पावसाचा जोर सुरुच आहे. त्यामुळे पुण्यातील धरणातून पाणी खाली सोडले जात असून ते सर्व पाणी उजनी धरणात येते. उजनी धरण आता १०६ टक्के भरले आहे. धरणात शनिवारी सव्वालाखांपर्यंत विसर्ग येण्याची शक्यता असल्याने पूर्वतयारी म्हणून शुक्रवारी दुपारी चार वाजता भीमा नदीतील विसर्ग ९० हजार क्युसेक केला होता. पुण्यातून येणारा विसर्ग वाढल्यास एकदम पाणी खाली सोडण्याचा प्रसंग उद्‌भवणार नाही, याची खबरदारी जलसंपदा विभाग घेत आहे. या पार्श्वभूमीवर उजनीतील पूरसाठा नियंत्रित ठेवला जात आहे. परंतु, पुण्यातून येणारा विसर्ग एकदम वाढल्यास उजनीतून मोठा विसर्ग सोडावा लागेल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नदी काठावरील लोकांनी सतर्क राहावे

पुणे जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने उजनीतील विसर्ग वाढू लागला आहे. अचानक विसर्ग वाढल्यास उजनीतून एकदम मोठा विसर्ग सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून सध्या ९० हजारांचा विसर्ग भीमा नदीत सोडला आहे. नदी काठावरील नागरिकांनी काही दिवसांसाठी सुरक्षित ठिकाणी राहावे.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

Web Title: Flood Threat To Pandharpur 90 Thousand Cusecs Of Water Was Released From Ujani Into Bhima

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..