Praniti Shinde
Praniti Shindesakal

सोलापूरच्या विकासासाठी प्रणितीताईंचा संघर्ष आवश्यक! ‘या’ पंचसूत्रीवर काम करण्याची हवी हमी

लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांनी विकासाच्या विविध मुद्द्यांबरोबर विमानसेवा, आयटी पार्क, दुष्काळमुक्त, भारनियमनमुक्त जिल्हा, खड्डेमुक्त सोलापूर या पंचसूत्रीवर काम करण्याची हमी देत निवडणुकीचे रणांगण गाजवले. महापालिका व विधानसभा निवडणुकीत आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी आता त्यांना सोलापूरच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्‍नावर लक्ष घालावे लागेल.

सोलापूर : सोलापूरच्या विकासाबाबत यापुढे मागील दोन खासदारांवर खापर फोडत बसण्यापेक्षा भविष्यातील पाच वर्षात विकासाच्या कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करण्याची गरज आहे. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळवून विकासाच्या साऱ्या अपेक्षा आता नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडूनच राहणार आहेत. केंद्रात भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेवर येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने विरोधक म्हणून तुम्हाला सरकारविरोधी आवाज उठविण्याची मोठी संधीच मिळणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या दृष्टीने कमालीची विरोधी परिस्थिती असतानाही आ. शिंदे व सुशीलकुमार शिंदे यांनी अत्यंत खुबीने या निवडणुकीत विजय मिळविला. केवळ शहर मध्यमध्ये स्वतः (काँग्रेस) आमदार असतानाही अत्यल्प मताधिक्य मिळाले तर पंढरपूर-मंगळवेढा, मोहोळ व दक्षिण सोलापूरमधून प्रचंड मताधिक्य मिळवत विजय सुकर करून इतिहास घडविला. आई व वडिलांच्या पराभवाचे उट्टे काढण्यात यश आले. मुळात निवडणुकीचा पूर्ण अजेंडाच स्वतःभोवती फिरवत त्यांनी विरोधकांना चक्रावून सोडले.

लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांनी विकासाच्या विविध मुद्द्यांबरोबर विमानसेवा, आयटी पार्क, दुष्काळमुक्त, भारनियमनमुक्त जिल्हा, खड्डेमुक्त सोलापूर या पंचसूत्रीवर काम करण्याची हमी देत निवडणुकीचे रणांगण गाजवले. महापालिका व विधानसभा निवडणुकीत आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी आता त्यांना सोलापूरच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्‍नावर लक्ष घालावे लागेल. शहरातील परिवहन सेवेच्या उर्जितावस्थेसाठी केंद्राच्या योजनेतून लाभ मिळवावा लागेल. चेन्नई-सूरत महामार्गासाठी लोकप्रतिनिधी म्हणून शेतकरी आणि रस्ते वाहतूक मंत्रालय यांच्यात समन्वय साधून तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याचीही गरज आहे.

स्थानिक प्रश्‍नांवर काही अंशी पाठपुरावा करण्याची गरज असेल. परंतु खासदारांनी केंद्रीय योजनांसाठी पाठपुरावा करत त्यातून सोलापूरचा कसा विकास साधता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. सुदैवाने जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट तर शेजारचे तुळजापूर, गाणगापूर ही तीर्थक्षेत्रे असताना आध्यात्मिक पर्यटनासाठी असलेल्या संधीचा कसा उपयोग करुन घेता येईल, याचा विचार होण्याची गरज आहे. उजनीसारख्या महाकाय जलाशयाबरोबरच हिप्परगा, बोरी (कुरनूर), होटगी, आष्टी, सोरेगाव येथील जलाशयावर केंद्रीय योजनेतून पर्यटन विकासाचेही स्वप्न पूर्ण करता येईल.

सोलापुरातील काही जाणकारांनी विकासाच्या कल्पना समाज माध्यमांतून मांडल्या आहेत. या धुरिणांनी खासदारांनी गल्लीबोळातील विषय अजेंड्यावर न घेता केंद्राच्या अखत्यारीतील विषयांवर काम करुन सोलापूरच्या विकासाची कवाडं खुली करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अन् ती रास्तही आहे. लोकसभा मतदारसंघातील तब्बल ४५० गावांना भेटी द्यायच्या की दिल्लीतील अधिवेशनाला हजेरी लावून निर्णय प्रक्रियेत सहभाग व विकास कामांचा पाठपुरावा करायचा अशी प्रत्येक खासदारांची तारेवरची कसरतच असते. पाच वर्षानंतर आपण विरोधी पक्षाचे खासदार होतो, त्यामुळे आपल्याला विकास करता आला नसल्याचा सूर येऊ नये, बस्स इतकीच अपेक्षा!

मोदी-शिंदे मित्रप्रेम

नरेंद्र मोदी व सुशीलकुमार शिंदे यांचे मित्रप्रेम सर्वश्रृत आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत ‘सुशीलकुमार शिंदे हमारे मित्र है‘ या मोदी यांच्या एका वाक्याने बदललेल्या वातावरणाचा इतिहास आजही ताजा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना श्री. शिंदे यांनी केलेल्या मदतीचा मोदी आवर्जून उल्लेख करत असतात. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाच्या वलयाचा दिल्ली दरबारी उपयोग होणार हे निश्‍चित! यातून विमानसेवा, विविध उद्योगांची उभारणी, सेमी कंडक्टर पार्क निर्मितीसाठी हजार एकरात नवीन एसईझेड तथा स्पेशल हायटेक वसाहत निर्मिती (आयटी पार्क), आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या निर्मितीसाठी अद्ययावत क्रीडांगण, जलतरण तलाव, मध्य रेल्वेचे सोलापूर विभागाचे कमी होणारे क्षेत्र वाचविण्याची गरज आहे. ४८ मंत्रालय, २५६ विभाग आणि १२४८ विविध योजना आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकार विकास कार्यक्रम राबविते. यासाठी निधीची कमतरता नसते.

लक्ष्यवेधी...

  • - स्मार्ट सिटीची दर्जेदार कामे

  • - होटगी व बोरामणी विमानतळ विकास

  • - शेतीमालासाठी परदेशी बाजारपेठ, कोल्डस्टोरेज

  • - टेक्स्टाईल व गारमेंट उद्योग विकास

  • - ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते

  • - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

  • - रखडलेले उड्डाणपूल

  • - सोलापूरला नियमित पाणीपुरवठा

  • - प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी

  • - हक्काच्या मिलेट सेंटरसाठी केंद्रातून निधी

  • - ५४ मीटरचा बाह्यवळण रस्ता

  • - बरुरचे पडीक सीआयएसएफ सेंटर

  • - प्रदूषणमुक्त भीमा-सीना नदी

  • - रेल्वे टर्मिनसची गरज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com