उपळाई बुद्रूकच्या जंगलाला आग ! दोनशे एकर परिसर बाधित; आमदार शिंदेंच्या तत्परतेमुळे विझला वणवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

उपळाई बुद्रूक ते चिंचोली रस्त्यावर असलेल्या मोठ्या घनदाट जंगलातील गवताला रविवारी दुपारी बाराच्या सुमारास अज्ञातांकडून आग लागली. ही लागलेली आग मोठ्या प्रमाणावर चोहोबाजूंनी पसरत चालल्याने तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला.

उपळाई बुद्रूकच्या जंगलाला आग ! दोनशे एकर परिसर बाधित; आमदार शिंदेंच्या तत्परतेमुळे विझला वणवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : वेळप्रसंगी लोकप्रतिनिधींना फोन केला तर उचलत नाहीत व फोन उचललाच तर काम होईल हे काही नक्की नसते... असे अनुभव कित्येकदा सर्वसामान्य नागरिकांना आले आहेत. परंतु याला अपवाद माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आहेत, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. रविवारी (ता. 14) दुपारी उपळाई बुद्रूक येथील सरपंच प्रतिनिधीने माळरानाला आग लागल्याची माहिती आमदार शिंदे यांना देताच, तासाभरातच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोचली व लागलेला वणवा विझला. 

उपळाई बुद्रूक ते चिंचोली रस्त्यावर असलेल्या मोठ्या घनदाट जंगलातील गवताला रविवारी दुपारी बाराच्या सुमारास अज्ञातांकडून आग लागली. ही लागलेली आग मोठ्या प्रमाणावर चोहोबाजूंनी पसरत चालल्याने तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग मोठ्या प्रमाणावर भडकत असल्याने व आगीचा वेग जोरदार असल्याने शेतकऱ्यांचा नाइलाज झाला. या लागलेल्या आगीमुळे जवळपास जंगलातील निम्मे गवत जळून खाक झाले होते. त्यामुळे कित्येक झाडे होरपळली जात होती. आग विझवण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने व वणवा पाहता, जंगल जळून खाक होईल की काय? अशी परिस्थिती निर्माण झाल्याने, सरपंच प्रतिनिधी धनंजय बेडगे यांनी आमदार बबनराव शिंदे यांना या घटनेची माहिती फोनद्वारे दिली. 

आमदार शिंदे यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोच केली. ही गाडी येईपर्यंत जवळपास 150 ते 200 एकरावर क्षेत्र जळून खाक झाले होते. या जंगलाला दहा - पंधरा दिवसांपूर्वीही अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आली होती. त्या वेळीही मोठ्या प्रमाणावर येथील झाडे होरपळून गेली होती. याबाबत वन विभागाकडून कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याने, रविवारी पुन्हा या जंगलात वणवा पेटला. रविवारी लागलेली आग विझवण्यासाठी धनंजय बेडगे, जावेद तांबोळी, ज्ञानेश्वर भांगे, विकास बेडगे, सिद्धेश्वर भांगे, महादेव भांगे, संतोष बेडगे, पप्पू पाटील, संजय पाटील, अमोल डुचाळ, जीवन भांगे, अभिषेक भांगे, मोहन भांगे यांनी प्रयत्न केले. 

या जंगलाला आग लागण्याची एका महिन्यात ही दुसरी वेळ आहे. सातत्याने वणवा पेटत असल्याने व येथील झाडे होरपळल्याने निर्जीव होत आहेत. याकडे वन विभागाने लक्ष द्यावे. आमदार शिंदे यांनी तातडीने अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोच करत सोय केल्याने आग विझवण्यासाठी मोठे सहकार्य लाभले. 
- धनंजय बेडगे, 
सरपंच प्रतिनिधी, उपळाई बुद्रूक 

वाऱ्याचा वेग आगीच्या विरुद्ध दिशेने असल्याने मोठ्या प्रमाणावर ही आग पसरली होती. अग्निशमन दलाच्या सहकार्याने तसेच स्थानिक शेतकरी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केले. संबंधित घटनेची चौकशी होण्यासाठी प्रयत्न करू. 
- सुरेश कुर्ले, 
वनरक्षक, मोहोळ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल