स्टॅन स्वामींना पाण्याच्या पेल्यासाठी झगडावे लागते, इतके मुर्दाड आहोत का आपण? आडम मास्तरांचा संताप 

Stan Swami_Adam Master
Stan Swami_Adam Master
Updated on

सोलापूर : पुणे येथील एल्गार परिषदेत सहभागी झाल्याच्या कारणावरून खोट्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेले झारखंड येथील आदिवासींच्या प्रश्नांसाठी आयुष्य समर्पित केलेले समाजसेवक स्टॅन स्वामी यांना पाणी पिण्यासाठी पेला व नळीची मागणी करूनही तुरुंग प्रशासन पेला आणि नळी उपलब्ध करून देऊ शकत नाही. इतके आपण मुर्दाड झालो की काय? असा संताप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तथा ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी व्यक्‍त केला. 

स्टॅन स्वामी यांना पाणी पिण्यासाठी त्वरित पेला आणि नळी उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचा ई-मेल श्री. आडम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक व तळोजा तुरुंगाचे अधीक्षक आदींना सोमवारी पाठवल्याची माहिती श्री. आडम यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 

निवेदनात माकपची भूमिका स्पष्ट करताना नमूद केले आहे, की केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एनआयएने एल्गार परिषदप्रकरणी खोट्या आरोपाखाली झारखंडमधील आदिवासींमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या स्टॅन स्वामी यांना मुंबईतील तळोजा तुरुंगात ठेवले आहे. स्टॅन स्वामींचे वय 83 असून त्यांना पार्किन्सन्स ही शारीरिक अवस्था आहे. त्यामुळे त्यांचे अवयव थरथर कापत असतात. साधे पाणी पिण्यासाठीही त्यांना पेला हातात धरणे शक्‍य नाही. पाणी पिण्यासाठी त्यांनी प्लॅस्टिकची नळी मिळावी म्हणून अर्ज केला होता. तशी नळी देण्यास एनआयएने असमर्थता व्यक्त केली आहे. 

त्यांनी 6 नोव्हेंबर रोजी एनआयए विशेष न्यायालयात हा अर्ज केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी एनआयएने 20 दिवसांची मुदत मागितली आणि दयाळू न्यायालयानेही ती दिली. त्यानुसार 26 नोव्हेंबर रोजी त्यावर झालेल्या सुनावणीत एनआयएने आपल्याकडे तशी नळी आणि नळी असलेले भांडे नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयानेही या गहन प्रश्नावर खल करण्यासाठी 4 डिसेंबर ही तारीख दिली आहे. 

या वयोवृद्ध मानवाधिकार कार्यकर्त्याला पार्किन्सन्सशिवाय इतरही व्याधी आहेत. त्यांना दोन्ही कानांनी ऐकू येणे कमी झाले आहे. ते तळोजा तुरुंगात असताना अनेक वेळा पडलेले आहेत. त्यांच्यावर हर्नियाची दोन वेळा शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. त्यांच्या पोटात सतत दुखत असते. 2016 च्या अपंगांच्या हक्कांसाठी केलेल्या कायद्यानुसार पार्किन्सन्स ही विकलांगता असल्याचे म्हटले आहे. भारताने सह्या केलेल्या विविध आंतरराष्ट्रीय करारांनुसार अपंगांना तुरुंगात आवश्‍यक सुविधा पुरवल्या पाहिजेत. 

केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारीतील एनआयएकडे पाणी पिणे सुकर होईल, अशी एकही नळी नाही. एका नळीची किंमत 50 पैसे असते. तेवढी रक्कम गृहमंत्र्यांनी मंजूर केलेली नाही. त्यामुळे एनआयए स्टॅन स्वामी यांना नळी देऊ शकत नाही. त्यावर विचारविनिमय करण्यासाठी त्यांना आठ दिवसांची मुदत न्यायालयाने दिली आहे. 

झारखंडमध्ये कॉर्पोरेट कंपन्या आदिवासींना आपल्या परंपरागत हक्काच्या जमिनीवरून बेकायदेशीरीत्या हुसकावून लावत आहेत. देशभरात हेच चालू आहे. स्टॅन स्वामी त्या आदिवासींना जागरूक करायचे काम करतात. स्टॅन स्वामींना महाराष्ट्रातील नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात ठेवले आहे. ते महाराष्ट्र राज्याचे पाहुणे आहेत. आम्हाला शिवाजी महाराजांच्या आतिथ्यशीलतेचा गौरवास्पद वारसा आहे. त्याला स्मरून आमच्या भगिनी-बांधवांसाठी लढणाऱ्या स्टॅन स्वामी यांना पाणी पिता यावे यासाठी योग्य ती साधने द्यावीत, अशी आमची इच्छा आहे. 

म्हणून मराठी जनतेने पेले आणि पेय पिण्याच्या नळ्या तळोजा तुरुंग अधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन आम्ही करत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा, अशी नम्र विनंती आहे. ही साधने तुरुंग प्रशासनाने स्वीकारून ती स्टॅन स्वामी आणि त्यांच्यासारख्या अवस्थेतील कैद्यांना पुरवाव्यात, असेही आवाहन करत आहोत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com