esakal | महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापूर एमआयएमची मोर्चेबांधणी सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

mim

यापूर्वीची एमआयएम आणि आताची एमआयएम यामध्ये खूप फरक आहे. शहर मध्यमध्ये एमआयएमची ताकद आहेच या शिवाय सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदार संघातही एमआयएमची ताकद वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एमआयएमच्या विस्तारात सर्व जाती व धर्मातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जात आहोत. एमआयएमचा होत असलेला विस्तार आणि मोर्चेबांधणीचे चांगले परिणाम महापालिकेच्या आगामी निवडणुकीत दिसतील. 
- फारूक शाब्दी, शहराध्यक्ष, एमआयएम, सोलापूर 

महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापूर एमआयएमची मोर्चेबांधणी सुरू 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिकेची होणारी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील सर्वच प्रमुख पक्षांनी राजकिय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एमआयएमने विस्तार सुरू केला आहे. ठराविक व्यक्तींच्या हातात असलेला एमआयएम आता विस्तारत आहे. वाहतूक संघटना व कामगार संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी नवीन आघाड्या स्थापन केल्या आहेत. या दोन्ही आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या झाल्यानंतर एमआयएमने विद्यार्थी आघाडी व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (एम. आर.) आघाडीचीही कार्यकारिणी जाहीर केली आहे. 

येत्या आठ ते दहा दिवसात एमआयएमच्या युवक आणि महिला आघाडीचीही कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी संपूर्ण सोलापूर शहरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी स्वत: लक्ष घातले आहे. 2017 मध्ये झालेली सोलापूर महापालिका निवडणुक एमआयएमसाठी पहिलीच निवडणुक होती. या पहिल्याच निवडणुकीत एमआयएमचे नऊ नगरसेवक विजयी झाले. एमआयएमचा हा विजय सर्वांना आश्‍चर्यचकित करणारा होता. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार व शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. 

कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात अनेक दिग्गज उमेदवार मैदानात असताना देखील एमआयएमने दुसऱ्या क्रमांकाच्या मतांपर्यंत घेतलेली झेप सर्वांनाच अचंबित करणारी होती. 2019 या दोन्ही निवडणुकीत शहर मध्य मध्ये एमआयएमने उमेदवार बदलून देखील एमआयएमच्या मतांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. उलट 2014 च्या तुलनेत 2019 च्या मतांमध्ये तब्बल दोन ते अडीच हजार मतांची वाढ झाली. त्यामुळेच महापालिकेच्या आगामी निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेवकांची संख्या वाढेल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. एमआयएममध्ये सर्व जाती व धर्माच्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्यासाठी व वीजबीलासह सर्वसामान्यांसह भेडसावणाऱ्या प्रश्‍नांवर एमआयएम आता आक्रमक भूमिका घेऊ लागली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर सातत्याने एमआयएम आवाज उठवू लागल्याने सोलापूरच्या सक्रिय राजकारणात एमआयएमचे अस्तित्व सिद्ध होत आहे.

loading image
go to top