Solapur | ग्लोबल टिचर डिसले गुरुजींना परत करावा लागणार 35 महिन्यांचा पगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Global Teacher Disale Guruji pay back 35 months salary soalpur
ग्लोबल टिचर डिसले गुरुजींना परत करावा लागणार 35 महिन्यांचा पगार

ग्लोबल टिचर डिसले गुरुजींना परत करावा लागणार 35 महिन्यांचा पगार

सोलापूर : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर (डाएट) प्रतिनियुक्‍ती असतानाही ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले हे ना "डाएट'कडे ना त्यांच्या शाळेकडे फिरकले. तरीही, त्यांना 35 महिन्यांचे वेतन देण्यात आले. आता, नोव्हेंबर 2017 ते ऑक्‍टोबर 2020 या काळातील वेतन त्यांना परत करावे लागणार आहे. त्यासंबंधीच्या कार्यवाहीची फाईल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून सामान्य प्रशासनाला पाठविण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाला क्‍यूआर कोड ही नवीन शिक्षण पध्दती देणारे ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांच्यासमोरील अडचणी वाढतच आहेत. त्यांच्याकडील माहितीचा लाभ इतरांनाही व्हावा याहेतूने त्यांना 17 नोव्हेंबर 2017 रोजी डिसले गुरुजींची "डाएट'वर नियुक्‍ती करण्यात आली. परंतु, नियुक्‍तीनंतर ऑक्‍टोबर 2020 पर्यंत ते "डाएट'कडे आलेच नाहीत, असा रिपोर्ट तेथील प्राचार्यांनी तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांना दिला. ही बाब लक्षात आल्यानंतर शेवटच्या काही महिन्यांतील वेतन डिसले गुरुजींना दिले नाही. डिसले गुरुजींच्या रजेच्या अर्जासंदर्भात थेट शालेय शिक्षणमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, डिसले यांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्याचा गंभीर आरोप केला.

तो आरोप प्रशासनाच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी कपाटातील चौकशी अहवाल बाहेर काढला. आता त्या अहवालातील विविध बाबींचा अभ्यास करून ग्लोबल गुरुजींवर कारवाई केली जात आहे. डाएट व शाळेत उपस्थित नसतानाही डिसले गुरुजींचे वेतन काढलेच कसे, या संदर्भात परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व कुर्डुवाडीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचा खुलासा आल्यानंतर वेतन वसुलीची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. या प्रकरणी ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

ठळक बाबी...

  • झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडून जेईडीकडे पाठविली फाईल

  • चौकशी अहवालात निष्पन्न झालेल्या बाबींवर आधारित वेतन वसुलीची कारवाई

  • शाळेचे मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडील खुलाशाची प्रतीक्षा

  • वेतन वसुलीचा कालावधी 17 नोव्हेंबर 2017 ते 5 ऑक्‍टोबर 2020

    तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्‍त केलेल्या चौकशी अहवालानुसार ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले हे नोव्हेंबर 2017 ते ऑक्‍टोबर 2020 या काळात कामावर हजर नव्हते. त्यानुसार त्यांच्याकडून आता त्या कालावधीतील वेतनाची वसुली होईल.

- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

Web Title: Global Teacher Disale Guruji Pay Back 35 Months Salary Soalpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Solapursolapur city