
शेतकऱ्यांसाठी खुषखबर! शेतीसाठी सोडलेले उजनीचे पाणी १० मेपर्यंत सुरुच राहणार
सोलापूर : धरणातील जिवंत पाणीसाठा आता ६० टक्क्यावर आला असून सध्या डावा, उजवा कालवा, सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजनेसह बोगद्यातून पाणी सोडले जात आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे उजनीतून सध्या सोडलेले पाणी आता १० मेपर्यंत सुरुच राहणार आहे.
रब्बीच्या सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे पीक मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यात उसाचे क्षेत्र मोठे असून साखर कारखानदारी वाढली आहे. जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले असून जिल्ह्याच्या कृषीक्रांतीत उजनी धरणाचे मोठे योगदान राहिले आहे.
पूर्वीपासून उन्हाळ्यात एक आवर्तन सोडले जात होते. त्यानंतर अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी शेतकऱ्यांची मागणी व जिल्ह्यातील पिकांचा अभ्यास करून उन्हाळ्यात दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांसाठी तो निर्णय खूपच फायदेशीर ठरला. पण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उन्हाळ्यात यंदा तीन आवर्तने देण्याचा निर्णय घेतला.
विशेष बाब म्हणजे हे तिन्ही आवर्तने सलग सोडण्याचेही स्पष्ट आदेश दिले. त्यानुसार आता १ ते २७ मार्च पहिले आवर्तन, त्यानंतर २७ मार्च ते २७ एप्रिल दुसरे आणि त्यानंतर १० मेपर्यंत तिसरे आवर्तन असणार आहे. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यातील सोलापूर महापालिकेची मागणी पाहून शहरातील नागरिकांसाठी देखील भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे.
१० मेपर्यंत चालणार पाण्याचे आवर्तन
उजनी धरणातून सध्या शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडले जात आहे. सलग तीन आवर्तने एकदम सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीत झाला असून त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे. शेतीसाठी डावा, उजवा कालवा व उपसा सिंचन योजनांसह बोगद्यातून सोडलेले पाणी मे महिन्यापर्यंत सुरुच राहणार आहे.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर
डाव्या कालव्याचे लवकरच मजबुतीकरण
उजनीतून पाणी सोडल्यानंतर कॅनॉलच्या गळतीमुळे त्यातील बहुतेक पाणी वाया जात असल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील ‘सीडब्ल्यूपीआरसी’ या केंद्रीय संस्थेकडून त्याचा अभ्यास केला जात आहे. सध्या टेस्टिंग पूर्ण झाले असून त्यावरील संशोधन झाल्यानंतर त्यांचा अहवाल जलसंपदा विभागाला सादर होईल. त्यानंतर संबंधित कामाचे इस्टिमेट करून त्यानुसार शासनाला रिपोर्ट सादर केला जाणार आहे. शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर डाव्या कालव्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे.