
‘समांतर’साठी शासनाकडून २०० कोटी
सोलापूर : सोलापूर ते उजनी या १७० एमएलडी क्षमतेच्या समांतर जलवाहिनीसाठी राज्य सरकारने २०० कोटी मंजूर केले आहेत. पूर्वीच्या योजनेत ३०० कोटींची भर पडत नव्याने ७८० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून महिन्याभरात जलवाहिनीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत देण्यात आल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.
सोलापूर ते उजनी या रखडलेल्या समांतर जलवाहिनीसाठी मुंबईतील समिती कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर श्रीकांचना यन्नम, स्मार्ट सिटी चेअरमन असीन गुप्ता,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ऑनलाइनद्वारे तर समिती कक्षात पालकमंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास प्रधान सचिव महेश पाठक, आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सिटी सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांच्यासह एमजेपी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहर पाणीपुरवठा योजना ही ११० एमएलडीची होती. भविष्यातील वाढीव लोकसंख्या पाहता ही जलवाहिनी १७० एमएलडीची आवश्यक असल्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकाडे पाठविला होता. या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी अतिरिक्त ३०० कोटी रुपयांची निधी आवश्यक होती. जुनी योजना ही ४८० कोटींची होती. या नव्या विकास आराखड्यानुसार ती ७८० कोटीवर गेली आहे.
निधीच्या उपलब्धेतेमुळे जलवाहिनी रखडली होती. या रखडलेल्या योजनेवर सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. राज्य शासनाने या योजनेसाठी २०० कोटी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तर १०० कोटी रुपयांचा हिस्सा महापालिकेने भरावे, असेही सांगण्यात आले. नेहमीप्रमाणे महापालिका आयुक्तांनी पैसे नसल्याचे कारण पुढे केले. परंतु कोणतेही कारण न देता ही योजना कार्यान्वित होण्यासाठी आर्थिक मार्ग शोधावे, अशी सूचना शासनाने दिली आहे. वाढीव पाणीपुरवठा योजना ही एमजीपीकडे तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्तावित होती. बैठकीत योजनेसाठीचा वाढीव निधी मंजूर झाल्याने समांतर जलवाहिनीचा मार्ग मोकळा झाला आहे. अवघ्या दोन दिवसात तांत्रिक मान्यता घेऊन येत्या महिन्याभरात नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. शासनाने चालू आर्थिक वर्षात १०० आणि पुढील वर्षात १०० कोटी रुपये देण्याचे मान्य केले. तर महापालिकेला अमृत योजना - २ अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून समांतर जलवाहिनीसाठी काही रक्कम उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सांगितले.