Engineering College : सोलापूरच्या इंजिनिअरिंग हबमध्ये पडणार भर! शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला यंदा मुहूर्त

सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यावर्षीपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण झाली आहे.
government polytechnic college solapur
government polytechnic college solapursakal
Updated on

सोलापूर - येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यावर्षीपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या महाविद्यालयासाठी ३०० कोटींचा निधी देण्याची घोषणा केल्यानंतर यावर्षी प्रवेश सुरू करणे शक्य होणार आहे. तंत्रनिकेतनमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना याच महाविद्यालयात प्रवेश मिळणे शक्य होणार आहे.

येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा आदेश १३ ऑक्टोंबर २०१६ मध्ये काढण्यात आला होता. त्यामध्ये सोलापूरसह राज्यातील अन्य पाच महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली होती. सध्या असलेल्या तंत्रनिकेतनचे श्रेणीवर्धन करून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करावा, असे या आदेशात म्हटले होते.

पण त्याचा अर्थ तंत्रनिकेतन बंद करून पदवी अभ्यासक्रम सुरू करणे असा काढला गेल्याने गोंधळ उडाला होता. त्याबाबत राज्य शासनाने १३ ऑगस्ट २०१७ ला शासनाने एआयसीटीईला पत्र पाठवून तंत्रनिकेतन व पदवी अभियांत्रिकी सुरू करावा, अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते.

प्रत्यक्षात सहा तंत्रनिकेतनपैकी रत्नागिरी व यवतमाळ येथे तंत्रनिकेतनला जोडून पदवी अभियांत्रिकी शिक्षण सुरू झाले. पण सोलापूरला काहीही झाले नाही. त्यानंतर २०२० मध्ये तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी २०२१-२२ मध्ये सोलापूरचे अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयाचे शैक्षणिक कामकाज सुरू करावे, असे आदेशात म्हटले होते. पण कोणतीच कार्यवाही झाली नाही.

त्यानंतर आता सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी ३०० कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले. त्यानुसार यावर्षी अभियांत्रिकी पदवीचे पहिल्या वर्षाचे प्रवेश सुरू होणार आहेत. याबाबत शासनाकडून अधिकृत पत्र प्राप्त होताच प्रवेश सुरू होणार आहेत.

सुसज्ज शासकीय तंत्रनिकेतन

शासकीय अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन सज्ज झाले आहे. सुरवातीपासून अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी सव्वातीन एकर क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच सुसज्ज ग्रंथालय, वसतिगृहे, भव्य क्रीडा मैदान, मेस, वर्कशॉप या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या वर्षाचे पहिल्या वर्षाचे प्रवेश असल्याने अध्यापनास प्राध्यापक वर्ग देखील उपलब्ध आहे.

गरीब घरातील मुलांचे स्वप्न होणार पूर्ण

मागील काही वर्षात सोलापूर हे इंजिनिअरिंग शिक्षणाचे हब बनले आहे. येथील नामवंत अभियांत्रिकी संस्थांनी केवळ पुणे नव्हे तर देशभरात सोलापूरची ओळख बनवली आहे. येथील अभियंत्यांनी विदेशातही नावलौकीक प्राप्त केला आहे. पण विडी कामगार व गरीब घरच्या मुलांना शिक्षणासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावे ही अपेक्षा या निमित्ताने पूर्ण होत आहे.

ठळक बाबी

  • एकूण ३२ एकराचा परिसर उपलब्ध

  • ५२ वर्ग एकचे प्राध्यापक उपलब्ध

  • ९ पीएचडी धारक प्राध्यापक

  • पदवीसाठी सिव्हिल, मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स व एआय अभ्यासक्रमाची शिफारस

  • स्थानिक टेक्स्टाईल्स उद्योगाची गरज लक्षात घेत टेक्स्टाईल इंजिनिअरिंगचा समावेश होण्याची शक्यता

शासनाच्या आदेशानुसार २०२० मध्ये सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या ठिकाणी अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय सुरू करण्याचा आदेश आल्यास तत्काळ कार्यवाही केली जाईल. यासाठी आवश्‍यक असलेली प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे.

- डॉ. अशोक उपाध्याय, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.