esakal | शेतकऱ्यांना आवश्‍यक ती सर्व मदत करू : पालकमंत्री; पंढरपुरातील नुकसानीची केली पाहणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Bharane

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. 

शेतकऱ्यांना आवश्‍यक ती सर्व मदत करू : पालकमंत्री; पंढरपुरातील नुकसानीची केली पाहणी 

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. 

पंढरपूर तालुक्‍यातील गार्डी, कासेगाव, सांगोला तालुक्‍यातील महूद येथील कासाळ-गंगा ओढा तसेच माळशिरस तालुक्‍यातील मळोली येथील अतिवृष्टीने पूर आल्यामुळे नुकसानग्रस्त पिकांची व पडझड झालेल्या घरांची पाहणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. या वेळी आमदार भारत भालके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, उदयसिंह भोसले, शमा पवार, तहसीलदार वैशाली वाघमारे, योगेश खरमाटे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, संतोष राऊत, स्मिता पाटील, तालुका कृषी अधिकारी गजानन ननवरे, दीपाली जाधव, राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, महावितरणचे श्री. कासार आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड झाली आहे. पंढरपूर, माळशिरस व सांगोला तालुक्‍यातील 54 गावांतील सुमारे 6500 ते 7000 हेक्‍टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त 517 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच बंधाऱ्यांचे व पाझर तलावांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुराच्या पाण्यामुळे काही गावांतील विद्युतपुरवठा खंडित झाला असल्याने विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आवश्‍यक ती मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री श्री. भरणे यांनी या वेळी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top