
Gudi padwa 2023 : ग्रामीण भागातील पाडवा वाचनाला विशेष महत्त्व शेकडो वर्षाची परंपरा कायम टिकून
मोहोळ : गेल्यावर्षी पेक्षा पाऊस जादा पडेल, धान्य मुबलक पिकेल, मनी मोती महाग होतील, पावसाला उशिरा सुरुवात होईल, लाल पीक नफा देऊन जाईल, पांढरे धान्य कमी पिकेल, खरीप साधारण येईल, वादळे जास्त सुटतील, जनावराकडे लक्ष द्यावे लागेल, त्यांच्या मागे रोगराई आहे,
दूध दुभते भरपूर प्रमाणात मिळेल, मंगल कार्य मोठया प्रमाणात होतील,"धन व धान्य" काटकसरीने वापरावे लागेल, चालू वर्षी पाऊस "परीटा" च्या घरी असून, वर्ष आनंदात जाईल असे पाडवा वाचन पापरी ता मोहोळ येथील मारुती मंदिरात करण्यात आले.
सध्या संगणकाचे व डिजिटल युग आहे. आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करीत आहोत. एवढे जरी असले तरी ग्रामीण भागातील "पाडवा वाचनाला"विशेष महत्त्व आहे. गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा अद्यापही सुरू आहे.
प्रारंभी गाव कामगार पोलीस पाटील प्रशांत पाटील यांच्या हस्ते पंचांगाचे पूजन करून, दत्तात्रय विठ्ठल विभूते यांनी वरील प्रमाणे पाडवा वाचन केले. ग्रामीण भागातील शेतकरी वर्षभर या पाडवा वाचनाच्या आधारे शेती करतो. पाडवा ऐकण्यासाठी गावातील नागरिकासह वाड्या वस्त्या वरील वृद्ध, मध्यम वयीन नागरीक आवर्जून उपस्थित होते.
"शेतकरी वर्ष" म्हणून गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. वर्षभराचे नियोजन शेतकरी याच दिवशी करतो. तसेच नव-नवीन उपक्रमाची सुरुवात ही याच दिवशी केली जाते. त्यात विहीर खोदणे घर बांधणे आदी चा समावेश आहे. सालगडी बदलणे, जुना बदलून नवीन सालगड्याची नियुक्ती करणे हेही याच पाडव्या दिवशी करतात. तसेच जमीन जागेचे खरेदी विक्रीचे व्यवहारही या दिवशी ठरविले जातात.
मारुती हे गावचे आराध्य दैवत आहे. मात्र मारुती मंदिरात येण्याचे भाविकांचे प्रमाण कमी झाल्याची खंत दत्त महाराज भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच मारुती समोर वर्षभर "ज्योत तेवत" ठेवण्यासाठी भोसले यांनी तेलाची मदत करण्याचे आवाहन केले. भोसले यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अनेक भाविकांनी स्वखुशीने आर्थिक मदत केली. शेवटी सर्व ग्रामस्थांना कडुनिंबा च्या मोहराचे वाटप करण्यात आले.