Heart Disease : तिशी-चाळिशीतच हृदयविकार? आयुर्वेदाचा घ्या आधार

आयुर्वेदात हृदयविकारासाठी सर्वसामान्यांना परवडेल अशी अत्यंत उपयुक्त औषधी
Heart disease age of 30 to 40  Ayurvedic treatment
Heart disease age of 30 to 40 Ayurvedic treatment

- श्रीनिवास दुध्याळ

सोलापूर : हृदयविकार तसेच इतर प्राणघातक व्याधींपासून आपला बचाव करण्यासाठी आयुर्वेदाचा अंगीकार प्रत्येक व्यक्तीने करणे आवश्यक आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रावर पूर्णपणे अवलंबून न राहता आयुर्वेदिक औषधोपचार त्यासोबतच घेणे आवश्यक असते.

कारण, रासायनिक औषधांमुळे रोगाचे उच्चाटन न होता फक्त आयुष्य वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात; त्यात कितपत यश मिळते हे आपण पाहतच आहोत. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, ईसीजी, बायपास याकरिता लाखो रुपये खर्चून देखील पुन्हा इतर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतच असतात व पुन:पुन्हा अँजिओप्लास्टी करावी लागते.

यासाठी लाखो रुपयांचा खर्च करणे सर्वांना शक्य नसते. लाखो रुपयांचा खर्च करून देखील शाश्वती नसते. तेव्हा फक्त आधुनिक वैद्यकशास्त्रावर अवलंबून न राहता त्यासोबत आपण आयुर्वेदिक उपचार तेदेखील सर्वांना परवडेल अशा खर्चात घेऊ शकतो.

कुठलाही त्रास नसताना अचानक तिशी- चाळिशीमध्येच अनेकांचा मृत्यू होताना पाहून मन सुन्न होते. तथापि, त्यापुढे जाऊन आपणास विचार करण्याची वेळ आता आली आहे.

हृदयविकारावर आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त औषधी आयुर्वेदात हृदयविकारावर अत्यंत उपयुक्त औषधी आहेत. रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणे तसेच रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेज कमी करणे शिवाय हृदय कमकुवत असेल तर ते मजबूत करणे यासाठी सद्य:स्थितीत प्रत्येक व्यक्तीने आयुर्वेदिक औषधी घ्यावीत. आयुर्वेदिक औषधांनी कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम न होता आपला हृदयविकारापासून बचाव होऊ शकतो.

चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणपणीच हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब

मानवाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृदय हा मांसपेशींनी बनलेला अवयव असून त्याचा आकार हाताच्या बंद मुठीएवढा असतो. प्रतिमिनीट ७२ प्रमाणे दिवसातून दहा लाख वेळा आपल्या हृदयाचे आकुंचन- प्रसरण होत असते. हृदय जोपर्यंत व्यवस्थित काम करू शकते तोपर्यंत मानव जिवंत असतो.

हृदय बंद झाले की मृत्यू अटळ असतो. शरीरातील रक्त प्रवाहाच्या संचलनाचे नियंत्रण हृदयाकडून होते. त्यात जेव्हा बिघाड होतो तेव्हा हृदयविकार होतो. हल्लीची चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, प्रदूषण, अन्नपदार्थांमध्ये भेसळ, अतिरिक्त कीटकनाशकांचा वापर, साखर व आयोडाइज्ड मिठाचा अतिवापर, जंकफूड, चायनीज,

पिझ्झा-बर्गर अशा बेकरी पदार्थांचा अतिरेक शिवाय धावपळ, ताणतणाव, वेळी-अवेळी भोजन, सात्विकऐवजी राजस, तामस आहाराचा अतिरेक यामुळे रक्त वाहन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. शरीरात तयार झालेल्या चरबीचे कण रक्तवाहिन्यांमध्ये साचत जाऊन रक्तवहनास प्रतिबंध करतात.

हे अडथळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये असतील तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. जर अडथळे मेंदूच्या भागात असतील तर पक्षवध (पॅरालिसिस) होऊ शकतो. पूर्वी या समस्या पन्नाशी- साठीनंतर उद्‌भवत असत; कारण वयोमानानुसार रक्तवाहिन्यांमध्ये काठीण्य येते व त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होत असतात. तथापि हल्लीच्या जीवनशैलीमुळे तरुणपणीच हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब या समस्या प्रत्येकामध्ये निर्माण होताना दिसतात. या समस्या आपण टाळू शकतो.

Heart disease age of 30 to 40  Ayurvedic treatment
World Heart Day 2023 : कोलेस्‍ट्रॉल नियंत्रणात ठेवायचंय? जाणून घ्या 5 सोपे उपाय

व्यायामातही पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण

हल्ली व्यायामात देखील पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करीत आहोत. जिममधील व्यायाम हा पिळदार व आकर्षक शरीर अवश्य तयार करतो तथापि तासन्‌तास जिममध्ये व्यायाम केल्याने तसेच त्यासोबत अतिरिक्त प्रोटिन्सचे सेवन केल्याने त्याचा हृदयावर अतिरिक्त ताण पडणे हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. तेव्हा भारतीय संस्कृतीमधील योगासन, प्राणायाम, जोर-बैठका हाच व्यायाम आपल्या भारतीय हवामानाला पोषक आहे.

धूम्रपान-मद्यपान हृदयाला घातकच

हल्ली धूम्रपानासोबत मद्यपानाला देखील प्रतिष्ठा मिळत आहे, जे स्वास्थ्यास अतिशय हानिकारक असते. याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, शारीरिक श्रमांचा अभाव, ताण-तणाव, आनुवंशिकता, रागीटपणा शिवाय दिवसातील २४ पैकी १८ ते २० तास कार्यालयीन कामकाज करणे, अपूर्ण विश्रांती, अपुरी झोप तसेच जिभेला स्वादिष्ट वाटणाऱ्या पदार्थांचे आणि कोल्ड्रिंक्सचे अतिरिक्त सेवन ही देखील हृदयविकाराची कारणे आहेत.

Heart disease age of 30 to 40  Ayurvedic treatment
Heart Attack Symptoms : पुरूषांना आणि महिलांना येणाऱ्या Heart Attack मध्ये काय फरक असतो? लक्षणं वेगळी असतात की सारखीच?

हृदयविकाराची लक्षणे

हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा सामान्यतः छातीमध्ये तीव्र वेदना होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दरदरून घाम सुटणे, मळमळ व चक्कर येणे, वेदना छाती-पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्याकडे होऊन तिथून त्या मान किंवा डाव्या हाताकडे जाणे, ही लक्षणे सुमारे २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकतात. काहीवेळा रुग्ण पांढरा पडतो व रुग्णाला मृत्यू येतो. हृदयविकाराच्या पहिल्या झटक्यातच ४० टक्के लोकांना मृत्यू येत असतो. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

असा घ्या आहार अन्‌ आयुर्वेदिक औषधी

आपल्या आहारामध्ये आयोडाइज्ड मीठ, साखर व चरबीयुक्त स्निग्ध पदार्थांचे सेवन करणे टाळावे. फायबरयुक्त व कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. सैंधव मिठाचा वापर स्वयंपाकात करावा. रोज सकाळी आपल्या शक्तीनुसार शारीरिक व्यायाम करावा. मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉलसाठीची औषधे नियमितपणे घ्यावीत.

त्यासोबतच लिंबू, आले, लसूण, विनेगर व मधापासून तयार केलेले ‘संजीवन’ रोज सकाळी अनुशेपोटी पाच ते दहा मि.लि. सेवन करावे. लिंबू, आले, लसूण, विनेगर आणि मध यांच्या गुणधर्मामुळे शरीरातील रक्तवाहिनीतील ब्लॉकेजेस, अडथळे कमी होऊन हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यासोबतच आयुर्वेदिक औषधे, कॅप्सूल, सिरप घेतल्याने अँजिओग्राफी व बायपासपासून आपला बचाव होऊ शकतो.

या गोळ्या नेहमी खिशात ठेवा

हृदयविकाराचा झटका कधीही कुठेही येऊ शकतो; तेव्हा रुग्णालयात पोचण्यासाठीदेखील वेळ मिळत नाही. ती १५ मिनिटे अतिशय महत्त्वाची असतात. तेव्हा रुग्ण रुग्णालयात पोचण्यापूर्वी त्याचा बचाव करण्यासाठी Sorbitrate ५ mg ही गोळी जिभेखाली ठेवावी. तसेच Ecosprin १५० mg च्या दोन गोळ्या आणि Statin ४० mg च्या दोन गोळ्या रुग्णास त्वरित दिल्यास रुग्ण हॉस्पिटलपर्यंत नक्की पोचू शकतो.

या तिन्ही गोळ्यांची किंमत अवघी ५० रुपये आहे. या गोळ्यांची किट आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कायम आपल्या खिशामध्ये, पर्समध्ये किंवा घरामध्ये ठेवल्यास आपला तसेच इतरांचा देखील जीव वाचू शकतो. दरम्यान वर उलेख केलेल्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्याने घ्याव्यात. परस्पर गोळ्या घेवू नये.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com