esakal | अक्कलकोट तालुक्‍यातील उत्तर भागात दमदार तर दक्षिणमध्ये पावसाची तुरळक हजेरी
sakal

बोलून बातमी शोधा

अक्कलकोट तालुक्‍यातील उत्तर भागात दमदार तर दक्षिणमध्ये पावसाची तुरळक हजेरी

अक्कलकोट तालुक्‍यात मागील तीन दिवसांमध्ये उत्तर भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून, अनेक गावांतील ओढे व नाले खळाळून वाहात आहेत.

अक्कलकोट तालुक्‍यातील उत्तर भागात दमदार तर दक्षिणमध्ये तुरळक पाऊस

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट (Akkalkot) तालुक्‍यात मागील तीन दिवसांमध्ये उत्तर भागात जोरदार पर्जन्यवृष्टी (Heavy Rain) झाली असून, अनेक गावांतील ओढे व नाले खळाळून वाहात आहेत. तर कुरनूर धरण (Kurnoor Dam) तुडुंब भरून दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे. मात्र, अनेक गावांमध्ये खरीप पिके पाण्याखाली गेल्याने थोडीशी नाराजी देखील आहे. याउलट तालुक्‍यातील भीमा काठासह उत्तर भागात अगदी तुरळक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

हेही वाचा: मोठा निर्णय! ग्रामसेवक, सरपंच ठरवणार गावगाड्यातील भटक्‍यांची जात

गेल्या तीन दिवसांच्या पावसाने चपळगावसह चुंगी, काझीकणबस, किणी, बोरगाव, घोळसगाव, बादोलेसह उत्तर भागात मुसळधार पाऊस होऊन गेला. या पावसामुळे बोरगाव ओढ्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळित झाली तर घोळसगाव तलाव तुडुंब भरून सांडव्यातून पाणी वाहिले. या भागातील प्रत्येक गावातील छोटे ओढे, नाले खळाळून वाहत असून अनेक गावांत अजूनही रस्त्यावर देखील पाणी वाहत आहे. अनेक गावात उभी ऊस व खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. तर दुसऱ्या बाजूस विहिरी आता भरण्याच्या मार्गावर असून वर्षभरासाठी शेती व पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. तसेच जेऊर ते तडवळपासून भीमा काठ, हिळ्ळी बंधारा भाग, मैंदर्गी व दुधनी मंडळात मात्र तुरळक पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिके अर्धवट आली आहेत आणि भीमेचे पात्रही रिकामेच आहे. तसेच विहिरींची पाणी पातळीही कमी झाली आहे. कुरनूरमधून तीन दरवाजे उघडून सोडत असलेले 450 क्‍युसेक प्रतिसेकंद इतके पाणी हेच बोरी काठी असलेल्या 50 गावांना दिलासा देऊ शकेल, अशी परिस्थिती सध्या आहे. आता तालुक्‍यातील सर्वच गावांत आणखी समाधानकारक पाऊस होण्याची शेतकरी वाट पाहत आहेत.

हेही वाचा: ओबीसी आरक्षणावरून प्रणिती शिंदे म्हणाल्या, 'या' समाजानेच टिकवली लोकशाही

अक्कलकोट तालुक्‍यातील पाऊस

31 ऑगस्ट 2021 अखेर पावसाची स्थिती (बाहेरची आकडेवारी मंगळवारची तर कंसातील आकडेवारी एकूण पावसाची मिलिमीटरमध्ये)

अक्कलकोट 15 (266), चपळगाव 15 (173), वागदरी 16 (218), किणी 14 (144), मैंदर्गी 03 (88), दुधनी 02 (157), जेऊर 07 (139), करजगी 01 (136), तडवळ 04 (128).

आकडे बोलतात...

  • मंगळवारी 31 ऑगस्टचा पाऊस : 08.55 मिमी

  • आतापर्यंत एकूण पाऊस : 161 मिमी

  • सर्वात जास्त पाऊस अक्कलकोट मंडळ : 266 मिमी

  • सर्वात कमी पाऊस मैंदर्गी मंडळ : 88 मिमी

loading image
go to top