कोरोनाला रोखण्यासाठी 'या' पाच गोष्टी गरजेच्या ! कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगच्या ढिलाईमुळेच वाढतोय कोरोना

3002Child_Mask_0_2.jpg
3002Child_Mask_0_2.jpg

सोलापूर : जागतिक आरोग्य संघटना व केंद्रीय आरोग्य यंत्रणेने एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 ते 30 संशयितांची कोरोना टेस्ट करण्याचे नियम घालून दिले. मात्र, पॉझिटिव्ह व्यक्‍तींकडून खोटे मोबाइल क्रमांक, चुकीचा पत्ता देणे अथवा संपर्कातील व्यक्‍तींची नावे लपविणे, रुग्णाच्या संपर्कातील संबंधित व्यक्‍ती स्वत:हून पुढे न येण्याचे प्रकार वाढत असल्यानेच कोरोना वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. मागील दहा दिवसांत राज्यात तब्बल 85 हजार रुग्ण वाढले असून सव्वातीनशे रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अशा कराव्या लागतील उपाययोजना 

  • मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा 
  • विवाहस्थळी पोलिस व संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांची असावी गस्त : उपस्थितांची रॅपिड टेस्ट करावी 
  • बाजार समिती, बाजारपेठांमधील गर्दीवर नियंत्रणासाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक हवी 
  • सार्वजनिक वाहतूक करताना नियम मोडणाऱ्या वाहनांवर आरटीओ, शहर, ग्रामीण पोलिसांकडून कठोर कारवाई व्हावी 
  • फळ, भाजीपाला विक्रेते, हातगाडे, हॉटेलमधील कर्मचारी, रिक्षाचालक, दुकानदार अशा सुपर स्प्रेडरची किमान 20 दिवसाला व्हावी टेस्ट

राज्यात कोरोनाचा जोर पुन्हा वाढू लागला असून रूग्ण वाढणाऱ्या राज्याच्या टॉप 15 शहरांमध्ये सोलापूरचाही समावेश आहे. राज्यभरात 1 ते 10 मार्च या काळात तब्बल 90 हजार 590 रूग्ण वाढले असून दुसरीकडे 426 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दहा दिवसांत सोलापूर शहरातील सात हजार 610 संशयितांमध्ये 343 जण पॉझिटिव्ह आढळले असून नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात 15 हजार 394 संशयितांमध्ये तब्बल 667 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 11 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्यातील पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, सातारा, अकोला, जळगाव या जिल्ह्यांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पॉझिटिव्ह रुग्णांनी दिलेल्या माहितीची पडताळणी अचूक केली जाणार असून चुकीची माहिती देणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. पोलिसांचे अपुरे संख्याबळ, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण, या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाना तसा निर्णय घेतला आहे. 

खोटी माहिती निघाल्यास संबंधितांवर कारवाई 
पॉझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कातील व्यक्‍तींची कोरोना टेस्ट करणे आवश्‍यक आहे. जेणेकरुन कोरोनाला थांबविता येऊ शकते. परंतु, रुग्ण त्यांच्या संपर्कातील व्यक्‍तींची माहिती लपवितात अथवा चुकीची माहिती देतात. त्याची पडताळणी केल्यानंतर खोटी माहिती निघाल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते. 
- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन

आयुक्‍तांच्या माध्यमातून ठोस निर्णय घेतला जाईल 
पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रुग्णाने संपर्कातील व्यक्‍तींचा दिलेला पत्ता, मोबाइल क्रमांक अथवा व्यक्‍तींची माहिती चुकीची असते. त्यामुळे आम्हाला त्याच्या घरी जाऊन अथवा शेजारील व्यक्‍तींकडून माहिती घ्यावी लागते. अनेकदा संपर्कातील व्यक्‍ती टेस्ट करून घेत नसल्याने आता आयुक्‍तांच्या माध्यमातून त्यासंबंधी ठोस निर्णय घेतला जाईल. 
- डॉ. बिरूदेव दुधभाते, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका 



क्‍वारंटाईन व्यक्‍तींचा घराबाहरे वावर 
पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कातील व्यक्‍तींना काही दिवसांसाठी होम क्‍वारंटाईन केले जाते. तर सौम्य लक्षणे असलेल्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले जाते. मात्र, रुग्णाच्या संपर्कातील बहुतांश लोक बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचेही अनेकदा समोर आले आहे. दुसरीकडे लक्षणे असतानाही संबंधित व्यक्‍तीने लवकर निदान करून न घेतल्याने त्याच्या माध्यमातूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आरोग्याधिकाऱ्यांचे मत आहे. दुकानदार, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांसह सार्वजनिक वाहतूक करणाऱ्यांचीही टेस्ट अजून पूर्णपणे झालेली नाही. मास्क, हॅण्डग्लोजचा वापर त्यांच्याकडून होत नाही. सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या तीन-चारचाकी वाहनांमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्‍तींना बसविले जाते.



पाच तालुक्‍यांत वाढतोय कोरोना 
सोलापूर जिल्ह्यात दहा दिवसांत तब्बल एक हजार 10 रुग्ण आढळले असून त्यातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे. शहर-जिल्ह्यात दररोज 95 ते 100 च्या सरासरीने रुग्ण वाढू लागले असून मृत्यूही वाढत असल्याची चिंता आहे. या काळात माळशिरसमध्ये सर्वाधिक 122, करमाळ्यात 111, माढ्यात 103, बार्शीत 99, पंढरपूरात 83, अक्‍कलकोटमध्ये 16, मंगळवेढ्यात 24, मोहोळमध्ये 36, सांगोल्यात 33, दक्षिण सोलापूरमध्ये 20 तर सर्वात कमी उत्तर सोलापूर तालुक्‍यात 10 रुग्ण वाढले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com