
सांगोला : चुलत भावाला शाळेतून घरी घेऊन जात असताना मालट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील चुलत बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोनंद ते गळवेवाडी (ता. सांगोला) रोडवर शेख वस्तीजवळ सोमवारी (ता. १६) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला. पल्लवी चंद्रकांत गळवे (वय १८) व गुरुप्रसाद रमेश गळवे (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे सर्वजण हळहळ व्यक्त करीत आहेत.
गळवेवाडी (ता. सांगोला) येथील मृत पल्लवी ही घरातून दुचाकीवरून (एमएच ४५, ४४२६) सोनंद येथील शाळेतील चुलत भाऊ गुरुप्रसाद यास पहिल्या दिवशी शाळा सुटल्यानंतर घरी आणण्यासाठी जात होती. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शाळा लवकर सुटणार होती. घरात कोणालाही न सांगता पल्लवी मोटरसायकलवरून चुलत भावास आणायला गेली होती. वास्तविक पल्लवीकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. जवळच्या अंतरावरील शाळेतून लगेच चुलत भाऊ गुरूप्रसादला घेऊन येऊ म्हणून ती गेली होती.
सोनंद ते गळवेवाडी रस्त्यावरील शेख वस्तीपर्यंत दोघेही सुखरूप आले, पण काळ वाट पाहतोय याची कल्पना नसलेली पल्लवीच्या दुचाकीला गळवेवाडीकडून सोनंदकडे भरधाव वेगाने निघालेल्या मालट्रकने (केए ११/४०८४) कट मारला आणि पल्लवी व गुरुप्रसाद दोघेही ट्रकच्या चाकाखाली सापडले. ट्रकने त्या दोघांनाही काही अंतरापर्यंत फरफटत नेले. ट्रक थांबेपर्यंत दोघांचाही त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. ट्रक लाकडाचे ओंडके घेऊन जात होता.
अरुंद रस्ता असल्याने ट्रकचा कट लागला
पल्लवी आपल्या चुलत भावाला ज्या रस्त्याने घेऊन येत होती, तो गावांतर्गत रस्ता होता. त्या रस्त्याने एकावेळी एकच जड वाहन जाऊ शकते, इतका तो अरुंद आहे. याचा अंदाज न आल्याने पल्लवीच्या दुचाकीची ट्रकला धडक बसली आणि दुचाकी बाजूला पडली, पण पल्लवी व गुरुप्रसाद ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडले. दोघांच्याही अंगावरून चाक गेले होते.
अपघातानंतर ट्रक चालक पसार
शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या अपघातात दोघेजण ठार झाले. अपघातानंतरचे दृश्य पाहून ट्रक चालक काही मिनिटातच गाडी जागेवर सोडून पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक पवन मोरे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.