निसर्गाच्या बदलत्या वातावरणावर मात करायची असेल तर गटशेतीशिवाय पर्याय नाही !  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

group farming

निसर्गाच्या बदलत्या वातावरणावर व बाजारपेठेतील दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांवर मात करायची असेल, तर आता गटशेती केल्याशिवाय पर्याय नाही. समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटाच्या माध्यमातून शेती केली तर कमी खर्चात भरघोस उत्पादन नक्कीच मिळेल, असे मत प्रगतशील शेतकरी राम नलवडे यांनी व्यक्त केले.

निसर्गाच्या बदलत्या वातावरणावर मात करायची असेल तर गटशेतीशिवाय पर्याय नाही ! 

sakal_logo
By
नानासाहेब पठाडे

पोथरे (सोलापूर) : निसर्गाच्या बदलत्या वातावरणावर व बाजारपेठेतील दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांवर मात करायची असेल, तर आता गटशेती केल्याशिवाय पर्याय नाही. समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटाच्या माध्यमातून शेती केली तर कमी खर्चात भरघोस उत्पादन नक्कीच मिळेल, असे मत प्रगतशील शेतकरी राम नलवडे यांनी व्यक्त केले. 

कामोणे (ता. करमाळा) येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गटशेती कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांनी संघटित होऊन एकत्रित शेती केली तर विचारांची देवाण - घेवाण होऊन कमी खर्चात जास्त उत्पादन मिळू शकते. शिवाय एकत्रित पीक घेतल्याने बाजारपेठेत होणारा खर्च कमी होऊन मालाला उच्चांकी बाजारभाव मिळू शकतो. 

या प्रशिक्षणात पुरुषांबरोबर महिलाही सहभागी झाल्या आहेत. प्रशिक्षक म्हणून सागर सहारे हे काम पाहात आहेत. गट शेतीबरोबरच शेतीच्या सुपीकतेनुसार आधुनिक पद्धतीने व टोकण पद्धतीने पिकाची लागवड, फळबाग लागवड व त्याचे मार्केटिंग याविषयी मार्गदर्शन दिले जात आहे. हे प्रशिक्षण शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टन्सिंग ठेवून सुरू असून शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

या प्रशिक्षणाबाबत कामोणे येथील शेतकरी भूषण पाटील म्हणाले, शासनाने सुरू केलेला हा उपक्रम अतिशय योग्य असून, शेतकऱ्यांनी त्याची अंमलबजावणी केली तर शेतकऱ्यांची नक्कीच आर्थिक उन्नती होईल. 

शेतकरी पंकज नलवडे म्हणाले, या प्रशिक्षणाचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. या प्रशिक्षणामुळे पारंपरिक शेतीला आधुनिकतेची व गटशेतीची जोड मिळणार आहे. त्यामुळे खर्च कमी व उत्पन्न वाढीस मोठा फायदा होणार आहे. 

शेतकरी सचिन नलवडे म्हणाले, बदलत्या काळानुसार आता शेतकऱ्यांनीही बदलले पाहिजे. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार आता आम्ही गट शेतीला प्राधान्य देणार आहोत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top