esakal | Video : सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एकाच ठिकाणी 
sakal

बोलून बातमी शोधा

important happenings in Solapur district in one place

पंढरपूर शहर पोलिस ठाण्याच्या आवारात रंगपंचमी साजरी करणे पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगलट आले आहे. विनापरवाना कार्यालायाच्या आवारात रंगाची उधळण करत छोट्या डॉल्बीवर लावलेल्या गाण्यावर नाचल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यातील 18 कर्मचाऱ्यांची मेडीकल स्टेट करण्यात आली आहे.

Video : सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एकाच ठिकाणी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपुरात रंगपंचमी पोलिसांच्या अंगलट 
पंढरपूर (सोलापूर ) :
पंढरपूर शहर पोलिस ठाण्याच्या आवारात रंगपंचमी साजरी करणे पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगलट आले आहे. विनापरवाना कार्यालायाच्या आवारात रंगाची उधळण करत छोट्या डॉल्बीवर लावलेल्या गाण्यावर नाचल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यातील 18 कर्मचाऱ्यांची मेडीकल स्टेट करण्यात आली आहे. त्यांच्या शरिरातील रक्ताचे नमुने घेवून ते पुणे येथील प्रयोगशाळेत अल्कोव्होलच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अचनाक केलेल्या या कारवाईमुळे पोलिस कर्मचारी अडचणीत आले आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालयाच्या आवारात सण उत्सव साजरे करु नयेत, असे आवाहन करण्यात आले होते. तरीही पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांनी शुक्रवारी रात्री पोलिस ठाण्याच्या समोरच छोटा डॉल्बी लावून रंगपंचमी साजरी केली होती. यामध्ये अनेक पोलिस कर्मचारी गाण्यावर नाचत रंगाची उधळण करत होते. 

कोरोनामुळे सांगोल्यात कोंबड्याचे मोफत वाटप 
सांगोला :
कोरोनामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांवर दर कपातीची मोठी कुऱ्हाड कोसळली. चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशा आशयाची एक म्हण आहे, आणि ही म्हण आता शब्दश: कोंबडीच्या स्वस्त दरामुळे प्रत्यक्षात उतरली आहे. कोरोनाच्या धसक्‍याने सांगोला तालुक्‍यातील गायगव्हान येथील युवा शेतकरी योगेश साळुंखे यांना चक्क कोंबड्या फुकट वाटण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, अशी मागणी केली जात आहे. चिकनमुळे कोरोना व्हायरस होत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरल्याने पोल्ट्री व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. सांगोला तालुक्‍यातील गायगव्हान येथील योगेश साळुंखे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये 10 हजार पक्षी असून कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे ग्राहक मिळत नसल्यानं या शेतकऱ्याला 18 लाखांचा माल फुकट देण्याची वेळ आली आहे. 

मोहोळमध्ये प्रबोधनाचे काम सुरु 
मोहोळ :
कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी मोहोळ नगरपालिका व तहसील प्रशासनाने नागरिकांचे प्रबोधन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले, असल्याची माहिती नगराध्यक्षा वंदना सुरवसे व तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. सध्या कोरोनाचा सर्वत्र मोठा बोलबाला सुरू आहे, दररोज नवीन येणाऱ्या माहितीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे खरी वस्तुस्थिती काय हे सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी नगरपरिषदेने प्रत्येक घंटागाडी वर डिजिटल फलक लावले आहेत. तसेच दररोज ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. शहरातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात कोरोना बाबत जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील कोंबड्या व मांस विक्रेत्यांना काळजी घेण्याबाबत पत्र देण्याचे काम सुरू आहे. 

अक्कलकोटमध्ये महाप्रसाद वाटपात बदल 
अक्कलकोट :
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 31 मार्चपर्यंत दैनंदिन दोन वेळा दिला जाणारा महाप्रसाद पूर्ण भोजन बसून देण्याऐवजी विशिष्ट अंतर ठेवून बुफे पद्धतीने दिला जाणार आहे. भक्तांना रांगेतून पर्यावरण पूरक द्रोणातून शिरा प्रसादही दिला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 32 वर्षापासून मंडळात दररोज सुमारे 15 ते 20 हजार भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. विविध उत्सव प्रसंगी ही संख्या लाखांचा घरात जाते. भक्तांच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रसाद पद्धतीत बदल केला आहे. 

माढा तालुक्‍यात रस्ता दुरुस्तासाठी निधी 
माढा :
तालुक्‍यात रस्त्यांच्या कामासाठी 12 कोटी 60 लाखांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. माढा तालुक्‍यातील रस्त्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरीव तरतूद केली आहे. माढा- वैरागमार्गे दारफळ रस्त्याकरिता एक कोटी, चांदज ते आढेगावकरिता दीड कोटी, टेंभुर्णी - बेंबळे ते परितेकरिता दीड कोटी, अंजनगाव ते वाफळे तालुका हद्द ते धानोरे ते मानेगावकरिता दीड कोटी, शेटफळ- कुर्डुवाडी रस्ता ते पाटीलवस्ती बावीकरिता 50 लाख, उपळाई ते विठ्ठलवाडीकरिता एक कोटी 10 लाख, दहिवली - निमगाव- पिंपळनेरकरिता 60 लाख, व्हळे - भेंड ते अरणकरिता 80 लाख, पीरवाडी ते विहीरकरिता 70 लाख, पिंपळनेर ते उजनी (माढा) करिता 90 लाख, सापटणे (भोसे) ते उपळाई बुद्रूककरिता अडीच कोटींच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे माढा तालुक्‍यातील रस्त्यांची कामे येत्या काही महिन्यांत सुरू होतील. 

मंगळवेढा तालुक्‍यात पर्जन्यामानात तफावत 
मंगळवेढा :
तालुक्‍यात हवामान आधारित फळ पीकविमा योजनेतील निकष ठरविण्यासाठी तालुक्‍यातील हवामान आणि महसूल खात्याच्या पर्जन्यमापकद्वारे नोंदवलेल्या पावसाच्या आकडेवारी तफावत आहे. कोणाच्या आकडेवारीनुसार भरपाई दिली हे विमा कंपनी सांगत नसल्याने फळपीक शेतकरी संतप्त झाले आहेत. हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत तालुक्‍यातील सात महसूल मंडल येथून नऊ हजार 373 शेतकऱ्यांनी विमा भरला. त्यात आंधळगाव एक हजार 98, बोराळे 256 ,मारापूर 935, हुलजंती चार हजार 127 अशा सहा हजार 416 शेतकऱ्यांना भरपाई दिली. त्यातील मरवडे एक हजार 132, मंगळवेढा 570, भोसे एक हजार 355 शेतकऱ्यांना वगळण्यात आले. आंधळगाव, हुलजंती, बोराळे महसूल मंडल येथे अतिवृष्टी, तर मारापूर मंडलात कमी पाऊस या कारणास्तव भरपाई दिली. वास्तविक पाहता ऑक्‍टोबर महिन्यातील अवकाळीचा फटका तालुक्‍याला बसला. 

बार्शी तालुक्‍यातील रस्त्यासाठी निधी मंजूर 
बार्शी :
तालुक्‍यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी 2020-21 या अर्थसंकल्पात सात कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून तालुक्‍यातील इतर रस्त्यांकरिताही लवकरच जास्तीत जास्त निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. तालुक्‍यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते खराब झाल्यामुळे त्या भागातील नागरिकांची सतत गैरसोय होत आहे. या रस्ता दुरुस्ती व रस्ते पक्के करण्याकरिता पाठपुरावा करून शासनाच्या विविध योजनांतून बार्शी तालुक्‍याकरिता निधी उपलब्ध केला आहे. बार्शी तालुक्‍यातील ग्रामीण भागातील प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी सात कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करून त्याची तरतूद 2020-2021 च्या अर्थसंकल्पात केली असून लवकरच रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत. 

loading image